Join us

'एसआरए प्रकल्पांमधील १३ हजार रहिवाशांवर होणारी कारवाई तत्काळ थांबवा, अन्यथा...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 7:14 PM

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा 

मुंबई: एसआरएच्या प्रकल्पांत सदनिका विकत घेऊन राहणाऱ्या १३१४३ कुटुंबांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची असून ती तात्काळ न थांबवल्यास याविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये असलेल्या विविध एसआरए प्रकल्पांमध्ये घर विकत घेऊन राहणाऱ्या १३१४३ परिवारांना ४८ तासात पुरावे सादर न केल्यास सदनिका रिकामे करण्याचे आदेश देऊन कारवाई केली जात आहे. या सदनिकाधारकांनी स्वतःच्या मेहनतीतून कमावलेल्या पैशाने या सदनिका विकत घेतल्या असून त्यांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले.या संदर्भात सद्य स्थितीतील कायद्यात बदल करून घर विकण्यासाठी असलेली १० वर्षाची अट कमी करून ती १ वर्षावर आणण्याचे गरजेचे आहे. घर विकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता पैसे देऊन घर विकत घेणाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत चुकीचे आहे. या संदर्भात पूर्वीच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याची स्पष्ट शिफारस त्यांच्या अहवालात केली होती. स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने घर विकत घेतलेल्यांना न्याय मिळावा याकरिता तात्काळ कायद्यात बदल करून त्या संदर्भातला वटहुकूम जारी करावा अशी मागणी आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास व या सदनिका धारकांवर होणारी कारवाई न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :अतुल भातखळकर