मुंबई : लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने काढलेला ‘गॅग’ आदेश सोशल मीडिया आणि मीडियाची मुस्कटदाबी करणारा आहे. लोकशाहीत आपल्या भावना व्यक्त करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र, नव्या गॅग आदेशाच्या आधारे व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा ठिकाणी व्यक्त होण्यावर निर्बंध लादले आहेत. हा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी भाजपने केली आहे. यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांची भेट घेतली.
भाजप शिष्टमंडळात दरेकर यांच्यासह आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर यांचा समावेश होता. मुंबईसाठीचा नवीन ‘गॅग’ आदेश हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा असल्याचे दरेकर यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. एकीकडे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अटक आणि मारहाण केली जात आहे. तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आक्षेपार्ह टिपणीबद्दल आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल रीतसर तक्रारीनंतरही कारवाई केली जात नाही. कलम १४४ चा आधार घेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सोशल मीडिया व मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
पोलीस प्रशासनाने गॅग आदेश मागे घ्यावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस महासंचालकांना दिले. कोरोना संकटकाळात जनतेसाठी झटणाऱ्या पोलिसांवर होणारे हल्ले चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेत्याविरुद्ध कारवाई करा
जुन्नर येथे अपंग व विधवांसाठी सामाजिक कार्य करणाºया बोराडे नावाच्या तरुणाला काँग्रेसचे नेते शेरकर यांनी मारहाण केली. जुन्नरच्या पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन काँग्रेस नेत्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केल्याचे दरेकर यांनी सांगितले.