'बाप्पांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन दादर चौपाटी, माहीम रेतीबंदरवरच करा'
By सचिन लुंगसे | Published: August 29, 2022 06:46 PM2022-08-29T18:46:35+5:302022-08-29T18:47:39+5:30
लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी विविध स्तरिय कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे
मुंबई : शीव परिसरात असणा-या एन. एस. मंकीकर मार्गालगतच्या सायन तलाव येथे दरवर्षी शीव, चुनाभट्टी इत्यादी नजिकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि, तलावाची भौगोलिक वैशिष्ट्ये, परिस्थिती व तलावातील जलचर इत्यादी बाबी लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करु नये, अशी विनंती ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर येथे करावे, असेही आवाहन पालिकेने केले आहे.
लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी विविध स्तरिय कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे. यामध्ये श्रीगणेश मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणा-या कामांचाही समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन ‘सायन तलाव’ येथे करु नये. या तलावात केवळ घरगुती श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ही सुविधा रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर येथे करावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.