ओहोटीच्या वेळेतच करा बाप्पाचे विसर्जन!; विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 01:24 AM2019-09-11T01:24:05+5:302019-09-11T01:24:21+5:30
गणेशोत्सव समन्वय समितीची सूचना
मुंबई : आठवडाभर सुरू असलेल्या उत्सवाच्या धामधुमीनंतर आता गणेशभक्तांना बाप्पांच्या विसर्जनाचे वेध लागले आहेत. या वर्षी मुंबईत गणपतींचे शिस्तबद्धतेने विसर्जन व्हावे यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने विसर्जनासाठी प्राथमिक नियमावली तयार केली आहे. यात मुख्यत: समुद्रात भरती असताना विसर्जन न करता, ओहोटीच्या वेळेतच बाप्पाचे विसर्जन करण्यात यावे, असे म्हटले आहे.
याखेरीज, उंच गणेशमूर्तींबाबत मार्गातील उड्डाणपूल व मेट्रोची कामे हे तपासून मिरवणुकीचा मार्ग निश्चित करावा. कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करीतच निश्चित मार्गावरून मिरवणुकींचे मार्गक्रमण करावे. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायरला स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. खोल पाण्यात उतरू नये. चौपाटी व विसर्जनाच्या ठिकाणी मूर्तीचे वाहन तसेच अति आवश्यक वाहने वगळता इतर वाहने नेऊ नयेत. गणेशमूर्ती नेणारे मोठे वाहन वा व्हील सुस्थितीत आहे का ते
पाहावे. कोणतेही व्यसन करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ नये.
या नियमावलीनुसार बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विसर्जनाची व्यवस्था नि:शुल्क
मूर्ती विसर्जनाकरिता पालिकेकडून केलेली व्यवस्था ही नि:शुल्क असते. त्यामुळे कोणीही पैशांची मागणी केल्यास ती पूर्ण करू नये, असे नियमावलीत बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने म्हटले आहे.