Join us

सतारसाधनेतील मग्न जीवन

By admin | Published: September 13, 2015 3:52 AM

ज्येष्ठ व श्रेष्ठ विश्वविख्यात अफताब-ए-सितार उस्ताद विलायत खाँसाहेब यांचे निकटवर्तीय शिष्य पं. मधुकर दीक्षित यांचे वयाच्या ८०व्या वर्षी अल्पशा आजारानंतर २ सप्टेंबर, २०१५ रोजी निधन झाले.

- सुरेश मालेकर

ज्येष्ठ व श्रेष्ठ विश्वविख्यात अफताब-ए-सितार उस्ताद विलायत खाँसाहेब यांचे निकटवर्तीय शिष्य पं. मधुकर दीक्षित यांचे वयाच्या ८०व्या वर्षी अल्पशा आजारानंतर २ सप्टेंबर, २०१५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती माधवी दीक्षित, मुलगा मिथिलेश व स्नुषा दीप्ती तसेच मोठा शिष्य परिवार आहे... दीक्षित यांच्या साधनेचा वेध घेणारा लेख. पं. मधुकर दीक्षित यांचा जन्म ५ नोव्हेंबर, १९३५ रोजी वाराणसी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. वडिलोपार्जित त्यांचा भिक्षुकी व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबात कोणतीही संगीताची पूर्वपीठिका नसताना त्यांना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली होती. परंतु, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांची सतार वादनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडील बंधूनी त्यांना त्या काळी सतार विकत घेण्यास ३५ रुपयांची मदत करून, त्यांना सतार शिकण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील तत्कालीन नामांकित सतारवादक पं. ज्योतीशचंद्र चौधरी या गुरूंकडे सतार शिकण्यास सुरुवात केली. पं. ज्योतीशचंद्र चौधरी हे त्यांचे आद्यगुरू. त्यानंतर त्यांनी सुमारे १९५७-५८मध्ये सतार वादनात प्रगती करण्याच्या दृष्टीने थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्यांनी अफताब-ए-सितार उस्ताद विलायत खान यांची भेट घेऊन सतार शिकण्याचा मनोदय व्यक्त केला. दीक्षित हे पं. ज्योतीशचंद्र चौधरी यांचे शिष्य असल्याने, खाँसाहेबांना त्यांना शिष्य करून घेण्यास, अडचण वाटली नाही. तेव्हापासून उस्ताद विलायत खाँसाहेबांनी त्यांना शिष्य केले. मुंबईत त्यांचे कोणीही नसल्याने व आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने, त्यांची मुंबईत राहण्याची सोय होऊ शकली नाही. परिणामी, खाँसाहेबांनी त्यांना त्यांच्याकडेच आसरा दिला. खाँसाहेबांचे तत्कालीन निकटवर्ती असलेल्या शिष्य गणांपैकी पं. अरविंद पारिख, पं. गिरीराज सिंह तथा पं. हरिशंकर पुराणिक हे सर्व दीक्षितांचे गुरूबंधू होत. पं. दीक्षित हे उस्ताद खाँसाहेबांचे विश्वासू शिष्य म्हणून गणले जात. पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे. तरीही नेहमी विनम्रपणे सांगताना खाँसाहेबांसारखे काम आणि गायकी अंगाने सतार वादन करणे कठीण असल्याचे ते म्हणत. त्यांची खाँसाहेबांवर निस्सीम भक्ती होती. ते घरी रियाज करतानाही खाँसाहेबांचा फोटो जवळ ठेवत. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाँसाहेबांच्या परवानगीने स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सतारीच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. भाडेतत्त्वावर जागा घेऊन ते राहू लागले. १९६५मध्ये ते विवाहबद्ध झाले. मुंबईतील एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभागात सतारीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचा विशेष गुण होता, ते सदैव प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. प्रसिद्धी म्हणजे बाजारीपणा, थोतांड आहे, असे त्यांचे ठाम मत होते. परिणामी, आत्तापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सतत झगडावे लागले. त्यांच्या हलाकीच्या परिस्थितीत त्यांच्या पत्नी श्रीमती माधवी दीक्षित या सदैव खंबीरपणे त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांचा मुलगा श्री मिथिलेश दीक्षित यालाही त्यांनी सतारीचे धडे दिले, तो उत्तम सतार वादन करतो. परंतु, वडिलांची एकंदरीत हलाखीची परिस्थिती पाहता त्याने सतार वादनात अधिक लक्ष न घालता शैक्षणिक पदवी संपादन करून घर सावरण्याचा निर्णय घेतला. पं. दीक्षित नेहमी म्हणत मिथिलेशनी नियमित रियाज केला, तर तो अप्रतिम सतारवादक म्हणून नावारूपाला येऊ शकतो. गुरूकडून सतारवादनाचे धडे घेऊन आपल्या मुलालाही ती दीक्षा देणारे पं. दीक्षित आज नाहीत. पण सतारसाधनेच्या रूपाने त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. (लेखक हे पंडित मधुकर दीक्षित यांचे शिष्य आहेत.)