‘अंधेरीचा राजा’चे १८ तासांनी वेसावे येथे समुद्रात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:53 AM2019-09-19T01:53:10+5:302019-09-19T01:53:19+5:30
अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता सुमारे १८ तासांनी गणेशभक्तांच्या उपस्थितीत वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.
मुंबई : अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता सुमारे १८ तासांनी गणेशभक्तांच्या उपस्थितीत वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.
राज्यातील जवळजवळ सर्व गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन करण्यात येते. आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती. मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा योग साधून अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता विसर्जन मिरवणूक निघाली. त्यानंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून निरोप दिला, अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.
१९७३ साली येथील आझाद नगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ देत़ आम्ही संकष्टीला विसर्जन करू, असा नवस त्यांनी अंधेरीच्या राजाला केला त्यानंतर कारखाने परत सुरू झाले. त्यामुळे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला सायंकाळी अंधेरीच्या राजाची संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते. यंदा मिरवणुकीत विद्युत रोशणाई करण्यात आली होती. तसेच महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढली होती़