मुंबई - कोविडचे सावट कायम असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१ टक्के अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी एक लाख ४० हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते, तर यावर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत एक लाख ६४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. त्यामुळे २०२० मध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावेळेस एक लाख ४० हजार घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी पालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली होती. त्यानुसार ७३ नैसर्गिक स्थळ १७३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती.
सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ३४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले, तर दहा दिवसांत एकूण एक लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६६ हजार २९९ मूर्तींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी झाले. त्याखालोखाल ४८ हजार ७१६ मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी झाले. त्यानंतर ३४ हजार ४५२ मूर्तींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी करण्यात आले.