अंधेरीत ३६२ गणपतींचे 'ॲप' मार्फत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:05+5:302021-09-23T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे विघ्न लक्षात घेता पालिका के/पश्चिम विभागाने विसर्जनासाठी 'ऑनलाईन स्लॉट बुकिंग ॲप' ( https:/?shreeganeshvisarjan.com/) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे विघ्न लक्षात घेता पालिका के/पश्चिम विभागाने विसर्जनासाठी 'ऑनलाईन स्लॉट बुकिंग ॲप' ( https:/?shreeganeshvisarjan.com/) चा वापर करण्याचे आवाहन केले होते. ज्याला साडेतीनशेहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिल्याची माहिती के/पश्चिम वाॅर्डच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.
अंधेरीच्या के/पश्चिम वाॅर्डमध्ये जुहू, सागरकुटीर व वर्सोवा हे तीन नैसर्गिक, १२ आर्टिफिशल, तर अन्य लेन ड्रॉप पॉईंट्स आहेत. त्यानुसार या सगळ्याचे लोकेशन 'ऑनलाईन स्लॉट बुकिंग ॲप'मध्ये अपलोड करण्यात आले होते. अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन होण्याची कल्पना पालिकेला होती. त्यानुसार दहा दिवसांत १० हजार ६७४ गणपतींचे विसर्जन या विभागात करण्यात आले. ज्यात घरगुती ९ हजार ८८७, सार्वजनिक ५६६, गौरी २२१, नैसर्गिक स्थळावर (समुद्रकिनारी) २ हजार ५८४, किनाऱ्यालगत गल्ल्यात ३ हजार ४०, कृत्रिम तलावात ४ हजार ९२० आणि संकलन वाहनांमार्फत १३० मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. ॲपच्या माध्यमातून ३६२ गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी के/पश्चिम वाॅर्डचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. त्यानुसार कमी वेळात देखील त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत ऑनलाइनचा पर्याय निवडला. त्यानुसार पुढील वर्षी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.