घरगुती गणेशमूर्तींचे पालिकेमार्फत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:08 AM2021-08-18T04:08:02+5:302021-08-18T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी असणार आहे. घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन गतवर्षीप्रमाणेच पालिकाच करणार आहे. यासाठी १७० कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.
दरवर्षी गणेशोत्सव मुंबईत धूमधडाक्यात साजरा करण्यात येत असतो, मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून सर्व सण व उत्सवावर विरजण पडले आहे. मात्र कोरोनाचे संकट यंदाही कायम असल्याने यावर्षीही कडक नियमावली असणार आहे. राज्य सरकारने सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत ठेवून कोरोना खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सवापूर्वीच्या काळात कोविडवाढीचा दर ०.६ टक्क्यांवर आला होता. गणपतीनंतर काही दिवसांनी रुग्णवाढीचा दर १.३० टक्क्यांपर्यंत वाढला. गणेशोत्सवात वाढलेल्या भेटीगाठी, गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्याकरिता कृत्रिम तलाव बनवून पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
गेल्यावर्षीची व्यवस्था....
नैसर्गिक विसर्जनस्थळे - ६८
कृत्रिम विसर्जनस्थळे - १६८
सार्वजनिक गणेशमूर्ती - ३७३३
घरगुती गणेशमूर्ती - ६४२१४
गौरीमूर्ती - २११४