लाडक्या गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:08+5:302021-09-21T04:07:08+5:30
मुंबई कोरोनाचे संकट कायमचे दूर करा, असे आपल्या लाडक्या बाप्पाला साकडे घालत मुंबईकरांनी गणरायाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ...
मुंबई
कोरोनाचे संकट कायमचे दूर करा, असे आपल्या लाडक्या बाप्पाला साकडे घालत मुंबईकरांनी गणरायाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. कोविडचा धोका कायम असल्याने मिरवणुकीला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षेचे सर्व नियम पाळत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३४ हजार ४५२ घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन करण्यात आले.
अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने यंदाचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात आला. मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यावर्षी बहुतांशी सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली नव्हती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असल्याने काही मंडळांनी पुढाकार घेत हा उत्सव कोविड नियम पाळत साजरा केला. महापालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे तर १७३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. यावेळीही कृत्रिम तलावातील विसर्जनाला चांगला प्रतिसाद लाभला. बहुतांशी घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घराशेजारील कृत्रिम तलावात करण्यास भाविकांनी पसंती दिली.
लसवंत दहा कार्यकर्त्यांनाच परवानगी
लसीचे दोन डोस घेतलेल्या कार्यकर्त्यांनाच विसर्जन स्थळापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक भाविक व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मंडप पासून ते मुख्य रस्त्यापर्यंत बॅण्डच्या तालावर वाजतगाजत, गुलाल उधळत, गणपती बाप्पांचा जयघोष करीत विसर्जन मिरवणूक काढत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले. मात्र, मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असल्याने नागरिकांची गर्दी कमी होती.
लालबागच्या राजाचे लवकर विसर्जन
लालबागमधील गणेशोस्तव हे मुंबईतील विशेष आकर्षण असते. त्यात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. ही मिरवणूक २१ तास चालते. यावर्षी लालबागच्या राजाची नेहमीची मूर्ती न बसवता विष्णूदेवतेच्या शेषनाग आरूढ स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, यंदा दुपारी १२ ते सायंकाळी ४.१५ या कालावधीत लालबागच्या राजाचे विधिवत, पूजाअर्चा करून गिरगाव चौपाटी येथे विसर्जन करण्यात आले.
दहाव्या दिवशी एकूण गणेश मूर्तींचे विसर्जन - ३४४५२
सार्वजनिक - ५०४३
घरगुती - २९०६०
गौरी - ३४९
कृत्रिम तलाव एकूण विसर्जन - १३४४२
सार्वजनिक - १८९०
घरगुती - ११३८७
गौरी - १६५