वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
By मनोहर कुंभेजकर | Published: September 18, 2024 10:31 PM2024-09-18T22:31:52+5:302024-09-18T22:33:29+5:30
नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती
मनोहर कुंभेजकर, मुंबई: वेसावे कोळीवड्याची आगळी वेगळी विसर्जन परंपरा आहे. अनंत चतुर्थीला काल सायंकाळी ७ वाजता येथे विसर्जनाला सुरवात झाली होती. तर आज दुपारी ३च्या सुमारास २० तासांनी येथील शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. या वर्षी शिपीलच्या तराफ्यामधून ७४ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. शिपील मधून गणेश मूर्तींच्या विसर्जनाची येथील आगळी वेगळी परंपरा आहे अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र मासळी व सचिव जोगेंद्र राजे यांनी दिली.
येथे शिपील (छोट्या होड्या) यांचा पुढे दोन व मागे दोन असा चार शिपीलचा (छोट्या होड्या) तराफा करून मध्यभागी गणेश मूर्ती ठेवली जाते. मग खोल समुद्रात फळी बाजूला करून गणेश मूर्तीचे सुखरूप विसर्जन करण्यात येते. गेली ३७ वर्षे मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे सुमारे ३५० ते ४०० सभासद या विसर्जन सोहळ्यात सक्रीय असतात.या संस्थेला यंदा ५२ वर्षे पूर्ण झाली.
येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती. तर वेसावे गावातून गणेश मूर्ती विसर्जनाला मार्गस्थ होतांना वेसावकर गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. गावात जणू उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण होते.
यंदा परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी वेसावे समुद्रकिनारी विसर्जनाची व फ्लड लाईट्सची देखिल व्यवस्था केली होती अशी माहिती उपाध्यक्ष अलंकार चाके आणि खजिनदार कल्पेश कास्कर यांनी व्यक्त केली.