मुंबई: यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे सातव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत संपूर्ण मुंबईत १७ हजाराहून अधिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी पाच हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदा मुंबईमध्ये ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. तसेच विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. यंदा पालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पर्यावरणाचा विचार करता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण १७,१८१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १५,२४३ घरगुती गणेशमूर्ती, १८६ गौरी तर १७५८ सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ५१४७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात ४६७७ घरगुती, ७६ गौरी तर ३९४ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या.
मुंबईत पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन
By सीमा महांगडे | Published: September 26, 2023 4:23 PM