Join us

यंदाही गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर कोरोनाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:16 AM

महापालिका लवकरच तयार करणार आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडचा शिरकाव मुंबईत झाल्यापासून सर्व सार्वजनिक उत्सवांवर विरजण पडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता नियंत्रणात आला आहे. मात्र ऑगस्ट अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत साशंकताच आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडे द्याव्या लागणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाला. त्यानंतर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.  अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे यावर्षीही गणेशोत्सव साजरा करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू असणार आहेत. त्यानुसार सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट, तर घरगुती मूर्ती दोन फूट ठेवण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.गेल्यावर्षी गणेशोत्सव व गणेश विसर्जन यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली होती. ही नियमावली यावर्षीही लागू असण्याची शक्यता आहे. तसेच गणेश विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होणे व त्यांना लांब जावे लागू नये, यासाठी मूर्ती संकलन केंद्र व १७० ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे सोसायट्यांमधील मूर्ती संकलित करण्यासाठी पालिका व्यवस्था करणार आहे. २०१९ मध्ये पालिकेने ३२ कृत्रिम तलाव तयार केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी कोविड काळात तब्बल १६८ तलाव तयार करण्यात आली.दरवर्षी सरासरी पावणेदोन लाख घरगुती गणेशमूर्ती तर १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. मात्र गेल्या वर्षी कोविड काळात हे प्रमाण सव्वालाखच्या आसपास होते.गेल्या वर्षी विसर्जनासाठी समुद्र तलावात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. तर महापालिकेने अनेक ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार केले होते.