अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक
By मनोहर कुंभेजकर | Published: September 30, 2023 06:04 PM2023-09-30T18:04:18+5:302023-09-30T18:04:29+5:30
मुंबईतल्या सर्वच गणेश मूर्तींचे दरवर्षी अनंत चतुर्थीला विसर्जन होते.
मुंबई - मुंबईतल्या सर्वच गणेश मूर्तींचे दरवर्षी अनंत चतुर्थीला विसर्जन होते. मात्र नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या पश्चिम उपनगरातील अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी दि,2 ऑक्टोबर रोजी संकष्टीला सायंकाळी सहा वाजता आझाद नगर 2 मधील अंधेरीच्या राजाच्या मंडपातून हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक निघणार आहे.आझाद नगर,आंबोली,अंधेरी मार्केट एस.व्ही. रोड मार्गे जे.पी.रोडवरून नवरंग सिनेमा, राजकुमार, धाके कॉलनी, चार बंगला, सात बंगला, पिकनिक कॉटेज, गंगा भवन या मार्गावरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि,3 ऑक्टोबर रोजी वेसावे समुद्रकिनारी पोहचेल.दुपारी दोनच्या सुमारास येथील भावे कुटुंबाने अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर मग मांडवी गल्ली जमातीचे कार्यकर्ते बोटीने खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन करतील अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी सभागृह नेते यशोधर(शैलेश) फणसे व समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी लोकमतला ही माहिती दिली.
1974 पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते आणि या दिवशी गणेश भक्त अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडतात.मिरवणूकी दरम्यान ठिकठिकाणी अंधेरीच्या राजावर पुष्पवृष्टी करतात आणि ओवळून त्याचे स्वागत केले जाते.तर दिवाळीत आपला फटाके विक्रीचा धंदा जोऱ्यात व्हावा यासाठी अंधेरी मार्केटचे अल्पसंख्याक बांधव अंधेरीच्या राजाचे स्वागत करतात अशी माहिती यशोधर(शैलेश) फणसे व सुबोध चिटणीस यांनी दिली.
मराठी योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दि,6 जून 1674 साली झाला होता,आणि त्यांनी येथून हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली होती.त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल यंदा येथे 4000 चौफूट जागेत हुबेहूब रायगड किल्ल्यात अंधेरीचा राजा विराजमान झाला आहे. गेल्या 12 दिवसात लाखो गणेश भक्तांसह अभिनेत्री शिल्पा शेट्टी सह अनेक सेलिब्रेटींनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले अशी माहिती समितीचे अध्यक्ष अशोक राणे आणि सचिव विजय सावंत यांनी दिली.