समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी नाही; महापालिकेचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:29 AM2020-08-13T01:29:49+5:302020-08-13T01:30:06+5:30
गणपती विसर्जनासाठी १६७ कृत्रिम तलाव
मुंबई : कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी यावर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन घराजवळ असलेल्या कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. मात्र गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यावर बंदी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘कोविड १९’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याची सूचना पालिकेने केली आहे. त्यानुसार गणेशमूर्तींची उंची चार फुटांपेक्षा अधिक नसावी, मंडपात गर्दी टाळणे, पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते असू नयेत, मिरवणूक टाळावी, अशा काही सूचनांचा समावेश आहे.
मात्र समुद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे़ त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यालगत एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात राहणाºया गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. मात्र समुद्रालगतच्या परिसरात राहत नसल्यास अन्य भाविकांनी प्राधान्याने घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क- सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
असे आहेत नियम
गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास शक्यतो घरच्या घरी अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.
विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक असू नये. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे.
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये.
विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने वापरावीत.