मनोहर कुंभेजकर
मुंबई : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार व विभागप्रमुख,माजी महापौर सुनील प्रभू यांनी परिमंडळ 4 चे उपायुक्त विजय बालमवार व पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांच्याकडे यंदा दिंडोशीत विसर्जनासाठी दरवर्षी होणारी गर्दी कमी करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवून, मूर्ती संकलन केंद्र व वाहनांवरील फिरत्या कृत्रिम तलाव उभारण्याची आग्रही मागणी केली होती.
याकामी मुंबईचे उप महापौर व प्रभाग क्रमांक 40 चे नगरसेवाक अँड.सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत व प्रशांत कदम, प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक तुळशीराम शिंदे, प्रभाग क्रमांक 38 च्या नगरसेविका विनया सावंत, प्रभाग क्रमांक 39 चे नगरसेवक आत्माराम सावंत यांनी अविरत मेहनत घेतली. तर ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहे त्याठिकाणी या मान्यवरांसह शिवसेनेचे शाखाप्रमुख,गटप्रमुख व शिवसैनिकांनी गणेश भक्तांकडून गणेश मूर्ती संकलन करून पालिकेला विसर्जनाला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे आज दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन सुरळीत पार पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दिंडोशी मधील विसर्जन व्यवस्था गणेश भक्तांना आधारवड ठरत आहे. दिंडोशीत विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले असून गणेश भक्तांच्या दारी पालिकेचे फिरते विसर्जन वाहन विभागात ठिकठिकाणी फिरत असून या संकल्पनेला देखिल गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद यंदा मिळाल्याचे चित्र आहे अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली. परिमंडळ 4 चे उपायुक्त विजय बालमवार आणि पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी चोख विसर्जन व्यवस्था ठेवली आणि पोलिस बंदोबस्त ठेवून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवली. तर मूर्ती संकलन केंद्र व गणेश भक्तांच्या दारी पालिकेचे फिरते विसर्जन वाहन विभागात ठिकठिकाणी फिरत असून या संकल्पनेला देखिल गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद यंदा मिळाल्याचे चित्र आहे अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावांची पाहणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी शिवसेनेच्या वतीने आवाहन व गणेश भक्तांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आमदार सुनील प्रभू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर(शांताराम) नैसर्गिक तलाव, स्वर्गीय मीनाताई ठाकरे मैदान कृत्रिम तलाव, (प्रभाग क्र. ४०), बुवा साळवी मैदानातील कृत्रिम तलाव (प्रभाग क्र. ४२), या दिंडोशीतील विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची आज सायंकाळी पाहणी केली.येथे येणाऱ्या गणेश मूर्तींचे मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी उपमहापौर अँड.सुहास वाडकर, विभागसंघटक विष्णू सावंत,नगरसेवक तुळशीराम शिंदे,नगरसेवक आत्माराम चाचे,नगरसेविका विनया सावंत, उपविभागप्रमुख भाई परब,शाखाप्रमुख संपत मोरे उपस्थित होते. पालिका प्रशासनाने विसर्जनाची चांगली व्ववस्था पालिका प्रशासनाने केली आहे. फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व विसर्जनासाठी दिंडोशीत होणारी गर्दी कमी होईल. फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे असे सूतोवाच आमदार प्रभू यांनी केले.