Join us

फिरत्या ट्रकवर विसर्जन टाक्या, महापालिकेने केली व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 1:50 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी टाळण्यासाठी गणेश आगमन आणि विसर्जन याकरिता कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.

शेफाली परब-पंडित मुंबई : महापालिकेने विशेष व्यवस्था म्हणून ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करून फिरती विसर्जन स्थळे निर्माण केली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेचे हे ट्रक फिरणार आहेत़ गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ही व्यवस्था केली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी टाळण्यासाठी गणेश आगमन आणि विसर्जन याकरिता कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत २,३५० सार्वजनिक मंडळांनी मंडप बांधण्याची परवानगी मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ३९० मंडळांची घट झाली आहे. तर एकूण अर्जांपैकी आतापर्यंत १,८२० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.शनिवारी घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. मात्र या वर्षी मुंबईकर गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना रूपी संकटाचा सामना करीत आहेत. त्यामुळे या सार्वजनिक उत्सवानिमित्त गर्दी वाढल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका असल्याने अनेक निर्बंध महापालिकेने लावले आहेत. यामध्ये गणेशमूर्तींची उंची कमी असावी, मंडपाचा आकार छोटा असावा, नैसर्गिक स्थळांवर प्रवेश बंदी, मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे.परिणामी, या वर्षी मंडपाच्या परवानगीसाठी येणाऱ्या अर्जांत घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी काही मंडळी सोसायटीत, चाळीत, खासगी जागेत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करीत असतात. २,७४० मंडळे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करीत असतात. मात्र यापैकी केवळ २,३५० मंडळांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत. यापैकी १,८२० मंडळांना परवानगी दिली आहे. तर २५६ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका