मुंबई : यंदा पहिल्यांदाच दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना वाद्यवृंदाचा वापर झालेला नाही. त्यामुळे यंदाचे दीड दिवसांचे गणेश विसर्जन ध्वनिप्रदूषण टाळत शांततेत पार पडले आहे.
कोरोनामुळे का होईना मुंबईकरांनी जगासमोर यानिमित्ताने एक चांगला आदर्श घालून दिला आहे. आवाज फाउंडेशनने दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी ठिकठिकाणी आवाजाची नोंद घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी वाद्यवृंदाचा वापर करण्यात आलेला नाही.मात्र तेथील वाहतूक आणि इतर ध्वनीमुळे आवाजाची नोंद ७० डेसिबलच्या आसपास झाली आहे, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी दिली. यंदा प्रथमच शांततेत विसर्जन सोहळा पार पडला आहे. कुठेच गर्दी नव्हती, सर्व काही शिस्तीतहोते.
काही मोजकी तुरळक ठिकाणे वगळली तर यंदा प्रथमच विसर्जनादरम्यान ध्वनिप्रदूषणाची नोंद झालेली नाही. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वरळी नाका येथे फटाके फोडण्यात आले होते. यावेळी ९१ डेसिबल एवढा आवाज नोंदविण्यात आला. याबाबतची तक्रार रहिवाशांकडूनच करण्यात आली. वरळी डेअरी येथे आठ वाजता वाद्यवृंद वाजविण्यात आले. यावेळी १००.७ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली.