स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना गवसली शिक्षणाची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:32 AM2021-01-03T06:32:00+5:302021-01-03T06:32:28+5:30

बालरक्षक स्वराली लिंबकर यांची सामाजिक बांधिलकी

Immigrant out-of-school children find direction in education | स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना गवसली शिक्षणाची दिशा

स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना गवसली शिक्षणाची दिशा

Next

- सीमा महांगडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन माहुल येथे करण्यात येते. येथे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मुलांच्या शाळा जुन्याच ठिकाणी असल्याने व जवळपास शाळा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे. प्रदूषणामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना त्वचेचे व श्वसनाचे आजार होते, त्यांनी शाळेत जाणे बंद केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपसूकच शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. मात्र स्वराली लिंबकर या शिक्षिकेने या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे कार्य सुरू केले.


लिंबकर यांना यासाठी तेथील रहिवासी, पालक यांचा विरोध होऊ लागला. वाद झाले, मात्र त्यांनी मागे न हटता त्यांच्या समस्या जाणून शेवटी आपले कार्य सुरू ठेवले. अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अनेक लहान मुले मुंबईतील रस्त्यांवर, सिग्नलवर, लोकलमध्ये पुस्तके, टोप्या, इतर वस्तू विकतात. या शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या, शाळा सुटलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न करताना कोणी फारसे दिसत नाही. परंतु, चेंबूरच्या जवाहर विद्या भवन शाळेतील शिक्षिका व राज्य सरकारच्या शाळाबाह्य मुक्त परिसर मोहिमेतील बालरक्षक स्वराली लिंबकर यांनी शाळा सुटलेल्या व कधीच शाळेत न गेलेल्या अशा तब्बल १३० पेक्षा अधिक मुलांच्या हातात पाटी दिली. इतकेच नव्हेतर, ही मुले नियमित शाळेत जात आहेत की नाहीत, याच्यावरही त्या लक्ष देत आहेत. 


समाजसेवेची आवड असलेल्या स्वराली यांच्या शाळेचा पट उत्तम आहे. तरीही या मुलांप्रमाणे रस्त्यावरील मुलांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी ‘बालरक्षक’ होण्याचा निर्णय घेतला आणि सरकारी नियमांचा आधार घेऊन मुख्याध्यापकांशी चर्चा करून मुलांच्या प्रवेशाचा मार्ग सोपा केला.


कोरोना काळातही मुलांचा शोध सुरूच
कोरोना काळात मुंबईतील शाळा बंद असल्याने अनेक मुले स्थलांतरित झाली, काही गावी गेली. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. या काळात स्वराली यांनी ऑनलाइन वर्गांना जी मुले बराच काळ उपस्थित राहत नाहीत, त्यांचा शोध सुरू केला. पाठपुरावा करून ती कुठे आहेत, काय करत आहेत, ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा नसल्यास काय पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, याचा शाेध घेऊन विविध उपक्रम सुरू केले.

Web Title: Immigrant out-of-school children find direction in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.