दहिसर नदीलगतचा सर्वात मोठा तबेला विरारला स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:20 AM2019-05-04T02:20:00+5:302019-05-04T02:21:41+5:30
महापालिकेच्या कारवाईला यश : नदी पुनरुज्जीवित होण्याच्या आशा पल्लवित
मुंबई : दहिसर नदीलगत असलेल्या तबेल्यांमुळे नदीला नाल्याचे स्वरूप आले होते. परंतु आता दहिसर नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण या नदीलगत असणाऱ्या २२ पैकी सर्वात मोठा असलेला गोल्डन डेरी फार्म हा तबेला मुंबईबाहेर विरार येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. तर उर्वरित तबेल्यांचे लवकरच स्थलांतरण होणार आहे. यामुळे महापालिकेच्या कारवाईला आणि रिव्हर मार्चच्या प्रयत्नांना यश आले आहे.
बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळून वाहणाऱ्या दहिसर नदीलगत २२ तबेले आहेत. यातील स्थलांतरित करण्यात आलेला गोल्डन डेरी फार्म या तबेल्यातील सुमारे १५० गाई-गुरे विरारला हलविण्यात आली आहेत. दहिसर नदीमध्ये मिसळणारे जनावरांचे मलमूत्र आणि मृत जनावरांविषयीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर महापालिकेच्या आर/मध्य विभागाने या तबेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आता येथील २२ तबेले काही महिन्यांत मुंबईबाहेर जाण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी वर्तवली आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात तबेल्यांचे छप्पर तोडल्यानंतर गाई-म्हशींना उन्हात उभे राहावे लागत होते. तसेच या तबेल्यांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावणे, गाई-म्हशी ताब्यात घेणे अशी कारवाई केली जात होती. परिणामी, गोल्डन डेरी फार्मच्या मालकानेच आपला तबेला मुंबईबाहेर स्थलांतरित केला आहे.
गोल्डन डेरी फार्मच्या १५० गाई-म्हशी विरारला नेण्यात आल्या आहेत, तर इतर तबेल्यांचे पाच मालक दहिसरमधून जाण्याच्या मार्गावर आहेत. तबेल्यातील जनावरांचे मलमूत्र व मृत जनावरे नदीत सोडली जातात. त्यामुळे नदी दूषित होत होती. परंतु महापालिकेच्या कारवाईनंतर तबेले स्थलांतरित होत असून ही एक चांगली बाब आहे. - विक्रम चोगले, सदस्य, रिव्हर मार्च
उर्वरित २१ तबेले सहा महिन्यांत मुंबईबाहेर
महापालिकेच्या आर/मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यासंदर्भात म्हणाले की, एक तबेला विरारला स्थलांतरित झाला असून बाकीचे तबेले हे पुढील सहा महिन्यांमध्ये स्थलांतरित होतील. तबेला मालकांना पहिली नोटीस दिली जाते. नोटीस देऊनही ऐकले नाही तर प्रकरण न्यायालयात दाखल होते. तसेच महापालिकेकडून तबेल्याच्या शेडवर कारवाई केली जाते. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये तबेल्यांवर चार-पाच वेळा कारवाई करण्यात आली होती.