झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:40+5:302021-03-17T04:06:40+5:30
तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातील निरीक्षण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा सामना करण्यात इमारतींमधील रहिवाशांपेक्षा चाळ, झोपडपट्टीतील रहिवाशांची प्रतिकारशक्ती उत्तम ...
तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातील निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा सामना करण्यात इमारतींमधील रहिवाशांपेक्षा चाळ, झोपडपट्टीतील रहिवाशांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याचे सेरो सर्वेक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सेरो सर्वेक्षण अहवालानुसार झोपडपट्टीवासीयांमध्ये ४५ ते ५७ टक्के अँटिबॉडीज तयार झाल्या, तर इमारतींमधील रहिवाशांमध्ये हेच प्रमाण १६ ते २१ टक्के आहे. आतापर्यंत सेरो सर्वेक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि नागरिकांची प्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सेरो सर्वेक्षण करण्यात येते. यानुसार आतापर्यंत सेरो सर्वेक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्याचा पहिला अहवाल आला आहे. त्यानुसार चाळ, झोपडपट्टीतील नागरिकांची प्रतिकारशक्ती इमारतींमधील रहिवाशांपेक्षा उत्तम असल्याचे समोर आले.
पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यात नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड) वाढत असल्याचेही स्पष्ट झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पहिल्या दोन टप्प्यांत इमारतींमधील रहिवाशांमध्ये १६ टक्क्यांपर्यंत अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या; तर तिसऱ्या टप्प्यातील एका अहवालानुसार हे प्रमाण २१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सेरो सर्वेक्षणाची माहिती कोरोना खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी पालिकेला उपयुक्त ठरत आहे.
१२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने
मुंबईत तिसऱ्या सेरो सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पालिकेच्या वेगवेगळ्या भागांतील १२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील सहा हजार नमुन्यांचा अहवाल आला असून यामध्ये अँटिबॉडीज वाढत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पुढील दोन आठवड्यांत उर्वरित अहवाल येईल, अशी माहितीही पालिका प्रशासनाने दिली.
काय आहे सेरो सर्वेक्षण
देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या अभ्यासासाठी रक्ताचे नमुने घेऊन करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास सेरो सर्वेक्षण म्हणतात. हे सर्वेक्षण मुंबईत नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इतर संस्थांच्या सहकार्याने होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या भागातील रक्ताचे नमुने घेऊन प्रतिद्रव्य चाचणी म्हणजेच अँटिबॉडीज टेस्ट केली जाते. कोरोनाचा सामना करणारी प्रतिपिंडे तयार झाली आहेत का, किती प्रादुर्भाव झाला आहे, याची माहिती सेरो सर्वेक्षणातून मिळते.
..........................