Join us

इम्युनिटी पॉवरची औषधे ठरत आहेत डॉक्टरांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, नियमित मास्क घालणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, नियमित मास्क घालणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याऐवजी बहुसंख्य नागरिक हे बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या इम्युनिटी पॉवरच्या मागे लागून शारीरिक स्वास्थ बिघडवत असल्याचे एका वैद्यकीय निरीक्षणातून दिसून आले आहे. काढा व गरमागरम वाफेच्या अतिरेकानंतर आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे; परंतु ही रोगप्रतिकारक औषधे आता डॉक्टरांची डोकेदुखी ठरत आहेत.

याविषयी अधिक माहिती सांगताना फिजिशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार म्हणाले,अनेक रोगप्रतिकारक औषधांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते व या अतिरिक्त साखरेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणतीही औषधे घेण्यापूर्वी शरीरातील अँटी बॉडीजचे प्रमाण तपासणे फार गरजेचे असते, परंतु अनेक नागरिक सोशल मीडियामध्ये येणाऱ्या जाहिरातीच्या भुलभुलैयात येऊन मेडिकल दुकानात सहज उपलब्ध होणाऱ्या गोळ्या तसेच सिरप घेतात.

गेल्या वर्षभरात अनेकांना कोरोनाची बाधा झाली असून ते कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रोगप्रतिकारक औषधे घेतल्यामुळे अनेकांची रक्त शर्करा पातळी घटली आहे. उदाहरणार्थ, खडीसाखर आणि कडुनिंब एकत्र खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते अशी पोस्ट जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आली तर अनेकजण याचा अवलंब करतात परंतु अनेकवेळा चाळीशी उलटलेल्या नागरिकांना या अतिरिक्त साखरेचा त्रास होतो व त्यांना भविष्यात मधुमेहाची ट्रीटमेंट घ्यावी लागते. अतिरिक्त काढा घेतल्यामुळे अनेकांना मूळव्याधीचा त्रास होण्यास सुरुवात झाली होती व अनेकांना शल्यचिकित्सेला सामोरे जावे लागले होते. रोगप्रतिकारक औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे कारण त्या औषधांमध्ये असलेल्या घटकांचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते याउलट योग्य आहार, नियमित व्यायाम व ६ ते ७ तास झोप घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या वाढू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नयेत

डॉ. संजय तारळेकर,हृदय शल्यविशारद

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीमुळे अनेकजण आर्थिक विवंचनेत आले आहेत याचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो, अनेकांना झोप न येणे, सतत चिंता असल्यामुळे जेवण न जाणे, चिडचिडेपणा, क्रोध येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे व याचा थेट परिणाम हृदयावर होत असतो. मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार घराघरांमध्ये पोहोचले आहेत व हे रुग्ण अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारातील रोगप्रतिकारक औषधे विकत घेतात. गेल्या वर्षभरात भारतीयांनी १५ हजार कोटींच्या व्हिटॅमिन टॅबलेट, सप्लिमेंट तसेच अँटिबायोटिक गोळ्या व तत्सम औषधे घेतली आहेत,यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या औषधांचा मुख्य समावेश आहे. हृदयविकार झालेल्या व हृदयविकाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.