Join us  

आयआयटीच्या टेकफेस्टवर प्रभाव ‘एआय’चा 

By रेश्मा शिवडेकर | Published: January 01, 2024 12:40 PM

एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली.

रेश्मा शिवडेकर, विशेष प्रतिनिधी

आशियातील सर्वांत मोठा तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’वरही यंदा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा (एआय) प्रभाव दिसून आला. एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली.

शिक्षण, आरोग्य, विज्ञान, संशोधन याबरोबरच दैनंदिन कामे, नागरी समस्या दूर करण्यात एआय कसे प्रभावी ठरू शकते, याचा आढावा टेकफेस्टमध्ये हजेरी लावणाऱ्या अनेक वक्त्यांनी भाषणातून घेतला. जपानच्या डिजिटल डेव्हलपमेंट मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तर त्यांच्याकडे भेगा पडलेल्या रस्त्यांची माहिती देण्यासाठीही एआयच्या तंत्राचा प्रभावीपणे वापर केला जातो. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी अंतराळ संशोधनातील एआयचे महत्त्व अधोरेखित करत थेट आयआयटीयन्सनाच इस्रोच्या, पर्यायाने देशाच्या उभारणीत हातभार लावण्याचे आवाहन केले. अशीच भूमिका संरक्षण दलातील माजी प्रमुख अधिकाऱ्यांच्या चर्चासत्रातूनही मांडली गेली. भविष्यात देशाच्या सीमारेषा सुरक्षित राखण्यात एआयच्या तंत्राला खूप महत्त्व येणार असल्यावर तिन्ही अधिकाऱ्यांचे एकमत होते.

टेकफेस्टमध्ये मांडल्या गेलेल्या ‘टेक कनेक्ट’ या महत्त्वपूर्ण प्रदर्शनातही याची प्रचिती आली. आयआयटीच्या नॅनो टेक्नॉलॉजीपासून पर्यावरण विज्ञान अशा विविध विभागात सध्या कुठले संशोधन कार्य सुरू आहे, याची माहिती देणारे जवळपास शंभरएक स्टॉल टेककनेक्टमध्ये होते. थोडक्यात, आपल्याला एआयची ‘डीप फेकू’ बाजूच प्रकर्षाने दिसते. परंतु, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राकरिता एआय शाप नसून कसे वरदान ठरत आहे, याची लहानशी झलक टेकफेस्टच्या निमित्ताने पाहायला मिळाली.

यंदाच्या टेकफेस्टचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संरक्षण क्षेत्रावरील भर. आयआयटीच्या पवई येथील मोठ्या मैदानात ग्रेनेड लॉन्चर्स, बोफोर्स ४० एमएम, ऑटोमॅटिक गन एल-७० यांच्यासह हाँगकाँगचे क्लीअर बॉट, स्वित्झर्लंडचे मॅग्नेको यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याला जोड म्हणून लष्कर, नौदल, वायू अशा तिन्ही दलातील माजी प्रमुखांचा सहभाग असलेल्या चर्चासत्राचा समावेश महोत्सवात करण्यात आला होता. पहिल्या दिवशी डीआरडीओचे माजी प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी डीआरडीओच्या कार्याला आयआयटीयन्सनी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याच्या जोडीला विज्ञान, संशोधन, उद्योग, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील वक्त्यांनी टेकफेस्टला हजेरी लावली. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या भाषणाला लाभला. त्या खालोखाल जिओच्या आकाश अंबानी यांच्या मुलाखतीला मुलांनी गर्दी केली होती. रिलायन्स जिओने १० वर्षांपूर्वी आयआयटीच्या संकुलात इंटरनेट सुविधा पुरवली होती. त्यानंतर नुकत्याच आलेल्या ५ जीचा मानही मुंबईच्या आयआयटी कॅम्पसला मिळाला आहे. जिओ आणि आयआयटीच्या या जुन्या नात्याला टेकफेस्टच्या निमित्ताने उजाळा मिळाला.

टॅग्स :तंत्रज्ञानआर्टिफिशिअल इंटेलिजन्स