गॅस दरवाढीचे विधिमंडळात पडसाद; "सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याच पाहिजेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:42 PM2023-03-01T12:42:08+5:302023-03-01T12:44:09+5:30
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.
मुंबई - राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. कांद्याच्या भावावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यासोबत, शेतकऱ्यांना अद्यापही अनेक प्रकारची देणी मिळाली नाहीत, त्यावरुनही विरोधक आक्रमक झाले होते. तर, विधानसभेच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याच्या माळा घेऊन आमदारांनी घोषणाबाजी केली होती. आता, अधिवेशनाचा दुसरा दिवस हा महागाई आणि गॅस दरवाढीमुळे गाजला. विरोधकांनी आज पुन्हा पायऱ्यांवर गॅस दरवाढीचा निषेध करत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढी कमी झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी आमदारांनी केल्या.
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे, आता मुंबईत सिलेंडरचे दर १,१०२.५० रुपये, नागपूरला १,१५४.५० रुपये, नाशिकला १,०५६.५० रुपये झाले आहेत. होळीपूर्वीच महागाईचे चटके सामान्य माणसाला बसले आहेत. त्यामुळे, विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येत विधानसभेच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली. यावेळी, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेतेमंडळीही उपस्थित होती.
शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो, महिलाविरोधी सरकारचा धिक्कार असो, शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे.. असे म्हणत वाढीव गॅस दरवाढीवरुन तीव्र संताप व्यक्त केला. महिला आमदारांनी गॅस सिलेंडरचे कागदी पोस्टर झळकावत सरकारचा निषेध नोंदवला
आज विधानमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरीविरोधी,महिलाविरोधी,जनमानसविरोधी सरकारचा महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निषेध केला
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 1, 2023
शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो
महिलाविरोधी सरकारचा धिक्कार असो
शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे..
घरगुती गॅसचे दर कमी झालेच पाहिजे..#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३pic.twitter.com/OWr0B5u8ua
घरगुती गॅस ५० रुपयांनी महाग
मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. लोकल टॅक्स कारणाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑईल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा ही नवी दरवाढ करण्यात आली आहे.