Join us

रुग्णालयांमध्ये रुग्ण, कर्मचारी संख्या रोडावली; पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 6:39 AM

अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही

मुंबई : रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची सेवा विस्कळीत झाली होती. या पावसाचा परिणाम मुंबईतील महापालिकेच्या आणि शासनाच्या मुख्य रुग्णालयातील सेवेवर झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही. त्याचप्रमाणे याचा परिणाम रुग्णालयातील ओपीडीवर झाला असून रुग्णसुद्धा रुग्णालयात कमी प्रमाणात आले होते.

पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. पावसाचा परिणाम मुंबई महापालिकेच्या केड़एम, सायन, नायर, कूपर आणि राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयात दिसून आला. अनेक रुग्णालयांतील कर्मचारी वेळेवर पोहोचले नाहीत किंवा काही येऊ शकले नाही.

मात्र, रुग्णालयातील सेवा अविरतपणे सुरू होती. रुग्णालयाला आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यांना उपचार देण्यात आले. त्यासोबत उपचारासाठी रुग्ण दाखल करण्याच्या संख्येवरसुद्धा परिणाम झाला होता.खासगी रुग्णालयातील परिस्थितीसुद्धा तशीच होती. अतितत्काळ विभागात उपचार देण्याचे काम सुरु असले, तरी नियमित ओपीडीवर याचा परिणाम दिसून आला आहे. काही ठिकणी नियोजित शस्त्रकिया करण्यात आल्या, असे सांगण्यात आले.

पावसामुळे अनेक कर्मचारी रुग्णालयात पोहोचू शकले नाही. त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्याचे दिसून आले. कारण, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच रुग्णसंख्याही कमी होती. नियोजित शस्त्रक्रिया होत्या, त्या करण्यात आल्या आहेत - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), मुंबई महापालिका 

टॅग्स :मुंबईपाऊसहॉस्पिटलकेईएम रुग्णालय