मुंबई : सध्या सांगली, कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईला होणाऱ्या दुग्ध पुरवठ्यावर झाला आहे. मुंबईला दररोज एकूण ४४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते, त्यामध्ये ६ लाख दूध कमी येत आहे.
मुंबई दूध संघटनेचे पदाधिकारी सी. के. सिंग म्हणाले की, पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने दूध संकलनात तसेच दुधाची वाहतूक करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी दूध वितरण करणाऱ्या गाड्या उशिरा पोहोचत आहेत. रात्री साधारण दोन ते तीन वाजता मुंबईत पोहोचणाऱ्या दुधाच्या गाड्या सकाळी पाच-सहा वाजता पोहोचत आहेत. यामुळे दूध वितरणाचे वेळेचे पुढील गणित कोलमडले आहे. दूध वितरण करणारे कर्मचारी ठराविक वेळेतच दूध वितरण करतात. दूध उशिरा पोहोचत असल्याने घरोघरी दूध पोहोचवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचेही यांनी सांगितले.
तर दूध विक्रेता अमित त्रिपाठी म्हणाले की, मुंबईत गोकुळचे दूध अधिक प्रमाणात वितरित होते. मंगळवारच्या दिवसभरात याचा सुमारे ५० टक्केहून अधिक साठा दुकाने आणि डेअरीपर्यंत पोहोचलेला नाही. पाऊस सुरू राहिला, तर येणाऱ्या दुधाच्या संकलनावर पुढील गणिते अवलंबून असतील, असे त्यांनी सांगितले.