बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्सवर फॅट कंटेंट कर लागू करा; पालक-शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:28 AM2024-03-04T10:28:15+5:302024-03-04T10:29:20+5:30
मुलांच्या आरोग्याकरिता हानिकारक असलेल्या बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्स, पास्ता अशा अतिरिक्त फॅटयुक्त पदार्थांवर ‘फॅट कंटेंट कर’ लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबई : मुलांच्या आरोग्याकरिता हानिकारक असलेल्या बर्गर, पिझ्झा, टॅको, डोनट्स, पास्ता अशा अतिरिक्त फॅटयुक्त पदार्थांवर १४.५ टक्के इतका अतिरिक्त ‘फॅट कंटेंट कर’ लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. केवळ लहान मुलेच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करता, अतिशर्करायुक्त पदार्थांवरही आरोग्यकर लागू करण्याची मागणी होत आहे. ‘अर्ली चाइल्डहुड असोसिएशन’ या पालक-शिक्षकांच्या संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात इंग्लंड, युरोपमधील देशांच्या धर्तीवर हा कर लागू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
१) जगभरात अनेक देशांनी साखर, गोड पेये आणि अतिचरबीयुक्त, साखर, मीठ असलेल्या खाद्यपदार्थांवर अतिरिक्त कर लावला आहे. शाळास्तरावर या खाद्यपदार्थांविरोधात मोहीम चालविली जात असून, या अंतर्गत मुलांच्या वाढदिवशी वाटण्यात येणारे केक, चॉकलेट्स, पॅकबंद पेये आणि वेफर्स बंद करून त्याऐवजी ताजी फळे देण्याचे आवाहन केले आहे.
२) तसेच, शीतपेयांचे कारखाने, मॉल्स आणि अतिरिक्त मीठ आणि साखरेच्या सेवनाला प्रोत्साहन देणाऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या फील्ड ट्रिपही बंद करण्यात येत आहेत.
पत्रातील इतर मागण्या :
१) सर्व फूड चेन आणि रेस्टॉरंटस्ना त्यांच्या मेनू, बॉक्स, पॅकेटस्वर प्रत्येक सर्व्हिंगमध्ये साखर-मीठ-चरबीचे प्रमाण किती, हे छापणे बंधनकारक करावे.
२) या पदार्थांचे प्रमाण दर्शविणारे रंगीत कोडेड लेबलिंग लागू करावे. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनामध्ये मीठ-साखरेसह काही पोषक घटक जास्त (लाल), मध्यम (अंबर) किंवा कमी (हिरवे) असल्यास ते सहजपणे लक्षात येतील.
याची नेमकी गरज का?
मुलांच्या आहारावर लक्ष दिले नाही तर भविष्यात त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतील. महाराष्ट्रात अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांनी मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आरोग्यावरही लक्ष देणाऱ्या बालवाड्या सुरू केल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षणात महाराष्ट्राने कायमच पुढाकार घेतला आहे.
ही खाद्य उत्पादने बनविताना कंपन्यांनी केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करू नये. हे पदार्थ मुलांच्या आरोग्याकरिता हानिकारक असल्याची जाणीव त्यांना असायला हवी. पालकांनीही आपल्या मुलांकरिता काय योग्य आणि काय चुकीचे हे समजून या पदार्थांच्या सेवनाला जाणीवपूर्वक नकार दिला पाहिजे. ही मोहीम शाळा आणि पालकांमध्येही चालविली जाणार आहे. त्यासाठी शाळांनीच मुलांचा स्नॅकचा मेनू तयार करण्यास सांगण्यात येत आहे.- स्वाती पोपट वत्स, अध्यक्ष, अर्ली चाइल्डहुड असोसिएशन