मुंबई : कार्बन डायऑक्साइडशिवाय इतरही हरितगृह वायूंवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. विशेषत: मिथेन या प्रभावी हरितगृह वायूचे संकट गंभीर आहे. भविष्यातील तापमानवाढीमुळे नैसर्गिक जगाला हानी पोहोचू शकते. अशा वेळी जमीन आणि समुद्र या परिसंस्था वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या पडतील. परिणामी तापमानवाढ रोखायची असल्यास नेट झिरो प्लॅन्सची अंमलबजावणी निर्णयकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. कार्बन डायऑक्साइड नष्ट करणे हे अतिशय कठीण नेट झिरो टूल आहे; मात्र उत्सर्जनाचे प्रमाण कमी केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो, असे पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या संस्था आणि अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सर्व स्थितींमध्ये पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. २०३० पर्यंत तापमानवाढीचा दर १.५ अंश सेल्सिअसपर्यंत आणि त्याही पुढे १.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतो. त्यानंतर शतकाच्या अखेरीस तापमानवाढीचा दर १.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकतो. मानवी प्रभावामुळे होणाऱ्या वातावरणातील तापमानवाढीचा दर गेल्या किमान २ हजार वर्षांतील अभूतपूर्व असा आहे. १७५० सालापासून हरितगृह वायूंच्या संकेंद्रणामध्ये झालेली अभूतपूर्व वाढ मानवी कृत्यांचा परिणाम आहे. २०१९ साली वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे झालेले संकेंद्रण हे २ दशलक्ष वर्षांत झालेल्या संकेंद्रणापेक्षा अधिक होते. मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड या महत्त्वाच्या हरितगृह वायूंचे झालेले संकेंद्रण हे गेल्या ८ लाख वर्षांतील सर्वाधिक आहे. तापमानवाढीचा दर वेगाने वाढत आहे. ५० वर्षांच्या कालावधीत वाढणाऱ्या भूपृष्ठ तापमानाचा विचार करता १९७० सालापासून वाढणारे भूपृष्ठ तापमान हे गेल्या किमान २ हजार वर्षांतील सर्वाधिक आहे.
गेल्या ३ हजार वर्षांत झाली नसेल एवढ्या वेगाने १९०० सालापासून जागतिक स्तरावर समुद्राच्या जलपातळीत वाढ होत आहे. १९८० सालापासून पाण्यातील उष्णलहरींची वारंवारता दुप्पट झाली असून २००६ सालापासून यात मानवी प्रभाव दिसून येत आहे. तापमानवाढीचा दर १.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास आपण जगासाठी अनपेक्षित आणि गंभीर जोखीम निर्माण करत आहोत. या गोष्टी जागतिक, प्रादेशिक पातळ्यांवरही लागू होतात. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे जागतिक प्रमाण गेल्या ४० वर्षांत वाढल्याची शक्यता आहे. मानवी प्रभावामुळे होणाऱ्या वातावरण बदलांमुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या माध्यमातून अतितीव्र पर्जन्यवृष्टी उद्भवण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत झालेल्या कार्बन उत्सर्जनाशी आपण सामना करत आहोत आणि भावी पिढ्यांच्या अडचणींत भर पडू नये यासाठी प्रयत्नशील आहोत. भौतिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहता मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीला ठरावीक मर्यादेपर्यंत सीमित करायचे असल्यास कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणणे आणि इतर हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. गेल्या ८ लाख वर्षांत कधीही नव्हते एवढे मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडचे संकेंद्रण सध्या वाढले आहे. जागतिक तापमानवाढीवर अंकुश ठेवण्यासाठी मिथेनवर मर्यादा आणणाऱ्या कठोर उपाययोजनांची गरज आहे. कार्बन डायऑक्साइड संकेंद्रण हे गेल्या किमान २ दशलक्ष वर्षांतील अभूतपूर्व आहे.