'सत्ताधारी शिवसेना सूडबुद्धीने काम करतंय, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 08:20 PM2020-09-13T20:20:54+5:302020-09-13T20:22:01+5:30
शिवसेनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी रिपाइंचे आंदोलन
मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसेनेने जबरी हल्ला केला त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत, कंगना राणावतला ही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
निवृत्त नौदल अधिकारी यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा केंद्र सरकार कडून मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
उद्धव आणि राज ठाकरे; शरद पवार हे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत का या पत्रकारांनी विचारलेक्या प्रश्नावर आपण ही महाराष्ट्राचे ब्रँड आहोत असे ना. रामदास आठवले म्हणाले. तेंव्हा निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी ही उत्स्फूर्तपणे आपण ना. रामदास आठवले यांचे फॅन असल्याचे म्हंटले.
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर कॉम्प्लेक्स मधील निवासस्थानी ना. रामदास आठवले यांनी भेट देऊन शर्मा यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून उपचार करून घेण्याचा सल्ला आठवले यांनी दिला. शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्याने कलम 307 ; 326 प्रमाणे गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, तशी कारवाई न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला आहे. याबाबत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निवृत्त नौदल अधिकारी मदन शरमा यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्यात पोलिसांनी योग्य गुन्हा दाखल करून योग्य तपास करावा या मागणीसाठी तसेच कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही हा ईशारा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने उद्या सोमवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता समता नगर पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस आयुक्त कार्यलयावर निदर्शने आयोजित केल्याचे रिपाइंचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव, रिपाइं युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड; चंद्रकांत पाटील ; आदींनी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.