मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. काहींनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे, तर नारायण राणेंनी थेट महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणीच गृहमंत्र्यांकडे केलीय.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अमित शहा यांना दिल्लीत असतानाच तीन दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे राणेंनी पत्रकार परिषेदत बोलताना सांगितलं. तसेच, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, असा आरोपही त्यांनी केला.
वाझेंचा गॉडफादर कोण?
सचिन वाझेंना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध आहेत, असा आरोप नारायण राणेंनी केला. तसेच, वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली. दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली. पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे? वाझेंना कोण वाचवत आहे, याची माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटलांचे प्रश्न
एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यात येत आहे. भाजपा नेते मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येतात.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
"अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. या सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
राज्य अस्थिर करण्याचा केंद्राचा प्रयत्न
संजय राऊत यांनी "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत पण राज्यात घुसायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळं राजकारण सुरू आहे. सचिन वाझेंना अटक झाली आहे. योग्य ती प्रक्रिया सुरू होईल. यावर मी बोलणार नाही. आरोप ठेवणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.