महिला सुरक्षा अभियान राबवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस, महापालिकेला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:06 AM2024-03-16T11:06:46+5:302024-03-16T11:08:17+5:30
नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात.
मुंबई : नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात. या महिलांना ज्याप्रमाणे आपण रोजगार देतो, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारीही आपली आहे. त्यामुळे मुंबई महानगरात मुंबई पोलिस आणि महापालिका यांनी एकत्रितपणे महिला सुरक्षा अभियान राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
महिला सशक्तिकरणाच्या उपक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने बळकटी दिली आहे. पालिकेनेही महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. यापैकी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ शिंदे यांच्या करण्यात आला.
प्रत्येक बचत गटाला एक लाख रुपये -
१) पालिका आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेद्वारे प्रत्येक बचत गटाला पालिका एक लाख रुपये देणार आहे. महापालिकेच्या विविध योजना आणि उपक्रमांमध्ये महिलांसह दिव्यांग, तृतीयपंथी यांचाही समावेश आहे.
२) ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासिका, महिलांसाठी वसतिगृह या सुविधाही महत्त्वपूर्ण आहेत. आकांक्षित महिला योजनेतून मिळणारा धनलाभ हा थेट महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जात असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील महिला सक्षम होत आहेत. - दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई शहर
केवळ महिलाच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी यांनाही नियोजन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या परिघात पालिकेने आणले आहे. २०२४-२५च्या आर्थिक वर्षात दिव्यांग व्यक्तींकरिता ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजना’ १ एप्रिल २०२४ पासून सुरू करीत आहोत. - सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त
बचत गटातील महिलांच्या कष्टाला कौशल्याची जोड देणे काळाजी गरज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच ३१ मे रोजी संपूर्ण मुंबई महानगरात किमान कौशल्य विभागामार्फत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कौशल्य विभाग’ सुरू करण्यात येणार आहे. या विभागात महिन्यातील तीन दिवस बचत गटांच्या महिला सदस्यांसाठी विपणन,प्रसिद्धीचे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येणार आहे. - मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, पश्चिम उपनगर.
प्रातिनिधिक स्वरूपात महिला बचत गटांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासह ७० हजार आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अनुदान जमा करण्यात आले. दिव्यांग स्वयंरोजगार योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांनाही अनुदान वाटप करण्यात आले.