आमसभेतील निर्णयांची अंमलबजावणी कागदावरच
By admin | Published: June 12, 2015 10:43 PM2015-06-12T22:43:00+5:302015-06-12T22:43:00+5:30
तालुक्यातील विविध विभागांच्या विषयांवर झालेल्या वादळी चर्चेमुळे महाड पंचायत समितीची आमसभा चांगलीच गाजली. बी. एस. बुटाला सांस्कृतिक
महाड : तालुक्यातील विविध विभागांच्या विषयांवर झालेल्या वादळी चर्चेमुळे महाड पंचायत समितीची आमसभा चांगलीच गाजली. बी. एस. बुटाला सांस्कृतिक भवनात आ. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयांची संबंधित शासकीय विभागांकडून कुठलीही कार्यवाही झालेलीच नसल्याचे अनेकांनी इतिवृत्त वाचनाच्या विषयांवर बोलताना आरोप केले, तर मागील आमसभेतील निर्णयांची अंमलबजावणी केवळ कागदावरच असल्याबद्दल अनेकांनी तीव्र शब्दात आपली नापसंती व्यक्त केली.
पंचायत समिती शिक्षण, बांधकाम, विद्युत, कृषी, राज्य परिवहन आदी महत्त्वाच्या खात्यांच्या खातेप्रमुखांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याबद्दलही सभेत अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. शासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी व शैक्षणिक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका सहकार्य करीत नसल्याचा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला, तर महाड एसटी आगारातून सायंकाळच्या वेळेत सुटणाऱ्या ग्रामीण भागातील गाड्या अचानक रद्द केल्या जातात, याकडे दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी लक्ष वेधले.
आमदार भरत गोगावले यांनीही शासकीय अधिकारी, सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. सभेला पं. स. सभापती दीप्ती फळसकर, उपसभापती प्रीती कालगुडे, जि.प. सदस्य निलेश ताठरे, सुरेश कातगुडे, अश्विनी घरटकर, बाळकृष्ण राऊळ, गटविकास अधिकारी संघरत्ना खिल्लारे, तहसीलदार संदीप कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)