झोपडपट्टी सुधार योजना राबवावी
By admin | Published: September 25, 2015 02:31 AM2015-09-25T02:31:22+5:302015-09-25T02:31:22+5:30
शहरातील झोपड्यांची संख्या ६० हजारपेक्षा जास्त झाली असून जवळपास ३ लाख नागरिक झोपडपट्टीमध्ये राहात आहेत
नवी मुंबई : शहरातील झोपड्यांची संख्या ६० हजारपेक्षा जास्त झाली असून जवळपास ३ लाख नागरिक झोपडपट्टीमध्ये राहात आहेत. या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात यावी, अशी सूचना मंदा म्हात्रे यांनी महापालिकेस केली आहे.
नवी मुंबई सुनियोजित शहर असले तरी येथील सिडको विकसित नोडमधील घरे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळेच शहरात रोजी - रोटीसाठी आलेल्या नागरिकांनी एमआयडीसी व सिडकोच्या जागेवर झोपड्या बांधून वास्तव्य करण्यास सुरवात केली. महापालिकेने २००० मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ४८ झोपडपट्ट्या असून त्यामध्ये ४१ हजार नागरिक वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु मागील १५ वर्षांमध्ये झोपड्यांची संख्या ६० हजारपेक्षा जास्त झाली आहे. यामध्ये राहणाऱ्यांची संख्याही ३ लाखपेक्षा जास्त आहे. दिघा परिसरातील ८० टक्के नागरिक झोपड्यांमध्ये वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये रबाळे, महापे, पावणे, तुर्भे, नेरूळपर्यंत झोपड्यांची संख्या वाढत चालली आहे. झोपडपट्टीवासीयांना पाण्यापासून नागरी सुविधांपर्यंत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ठोस पावले उचलावी अशा सूचना म्हात्रे यांनी केल्या आहेत. त्यांनी गुरुवारी महापौर सुधाकर सोनावणे यांची भेट घेवून या विषयावर चर्चा केली.
झोपडपट्टीवासीयांसाठी आपण कोणत्या योजना राबवू शकतो, याविषयी विशेष बैठकीचे आयोजन करावे. बैठकीला झोपडपट्टी परिसरात काम करणारे लोकप्रतिनिधींना बोलावण्यात यावे अशा सूचना केल्या. यावेळी सभागृहनेते जयवंत सुतार, सुरेश कुलकर्णी, रवींद्र इथापे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)