मुंबई : पुण्यातील कळमोडी धरणातून तातडीने उपसा जलसिंचन योजना राबवण्याची मागणी करत दुष्काळी गावांच्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा दिला नाही, तर १० जानेवारीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी सोमवारी पत्रकार भवन येथे बोलताना दिला आहे.टाव्हरे म्हणाले की, मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांना निवेदन दिले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, गोसासी, वरुडे, वाफगाव; तर आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच शिरूर तालुक्यातील केंदुर, पाबळ ही गावे कायमस्वरूपी पाण्यासाठी वंचित आहेत. कळमोडी धरण बांधून तयार आहे. पाणी योजनेचे अंदाजपत्रक वाढत चालले आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील ८४३ हेक्टर क्षेत्राचा समावेश प्रस्तावित आहे. थिटेवाडी बंधारा यंदा कोरडा पडला आहे. त्यामध्ये पाणी सोडण्यासाठी धरणाचे पाणीवाटप बदलले पाहिजे. या भागातील लोकप्रतिनिधींनी साडेचार वर्षांत शासनाकडे ठोस पाठपुरावा केला नाही. मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांनी या भागातील तीव्र दुष्काळी परिस्थिती व कायमची पाणीटंचाई पाहून या योजनेसाठी प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर करून या उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून कामास सुरुवात करावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.राखीव ठेवलेले पाणी उपलब्ध करावेसातगाव पठार, खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावे तसेच थिटेवाडी धरणात वेळ नदीद्वारे पाणी सोडून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. त्यासाठी कळमोडी धरणाचे चास-कमान धरणासाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कळमोडी पाणलोट विकास संस्थेने मंत्रालयात मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांना केली. मंत्रालयात झालेल्या बैठकीस टाव्हरे यांच्यासह संस्थेचे खजिनदार रामदास दौंडकरही उपस्थित होते. शासनाने एक महिन्यात ठोस उपाययोजना करून न्याय दिला नाही. तर १० जानेवारीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संस्थेने दिला आहे.