मुंबई : कोरोनाच्या लढ्यामध्ये टाटा ट्रस्ट सरकारच्या मदतीला धावून आला आहे. ट्रस्टतर्फे आवश्यतयक वैद्यकीय उपकरणे, पीपीई कीट, मास्क, हातमोजे, एन 95 मास्क, विविध प्रकारातील सर्जिकल मास्क अशा सुमारे दीडशे कोटीच्या विविध वस्तूंची भारतात आयात करण्यात येत आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने या वस्तुंची वाहतूक करण्यात आली.
टाटा ट्रस्ट ने टाटा इंटरनँशनल लिमिटेडच्या मदतीने ही आयात केली असून देशाच्या विविध भागात ज्या ठिकाणी या वस्तुंच गरज असेल त्या ठिकाणी या वस्तू पोचवल्या जातील. अशा प्रकारे सुमारे एक कोटी वस्तु काही टप्प्यांमध्ये भारतात आणल्या जातील त्यामधील काही वस्तू सध्या आणण्यात आल्या आहेत. टाटा इंटरनँशनल लिमिटेडचे प्रमुख नोएल टाटा असून टाटा ट्रस्टचे रतन टाटा यांच्या सहकार्याने हे मदतकार्य केले जात आहे. देशाच्या विविध भागात अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे व इतर आवश्यक वस्तुंची वाहतूक करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर केला जात आहे.
कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी शुक्रवार देण्यात आला. कोरोना’च्या लढ्यासाठी बँकेतर्फे ही मदत देण्यात आली. बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांनी मंत्रालयात मदतीची पे-ऑर्डर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जमा केली. संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोकण बँकेतर्फे 11 लाख रुपये 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19'साठी देण्यात आले आहेत असे नजीब मुल्ला म्हणाले.