नवी मुंबई : पालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यातील गुंडांची मदत घेतली होती. शहरात ठिकठिकाणी टपोरींच्या झुंडी उभ्या असल्याचे चित्र दिसत होते. अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या ९०० जणांवर कारवाई केली होती. निवडणूक व उत्सव काळात मारामारी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांना तडीपार केले होते. प्रत्येक निवडणुकीमध्ये अशाप्रकारची कारवाई केली जाते. यामुळे मागील काही वर्षांपासून गुंडांचेही आऊटसोर्सिंग करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. निवडणुकीदरम्यान विशेषत: मतदानादिवशी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात गुंडांना पैसे देऊन शहरात बोलावले जात आहे. शहराबाहेरील शेकडो तरुण अनेक प्रभागांमध्ये फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सकाळी साडेनऊ वाजता नेरूळ पश्चिमेला चेंबूर ते सायन दरम्यान राहणारे १०० पेक्षा जास्त तरुण अनेक ठिकाणी घोळक्याने उभे होते. यामधील अनेकजण झोपडपट्टी परिसरातील रहिवासी असून त्यांच्यावर मारामारीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे येथील तरुणांनी सांगितले. शहरात अनेक प्रभागांमध्येही बाहेरून गुंड बोलावण्यात आले होते. दिवसभर मतदान केंद्र व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोलीमध्येही असेच चित्र दिसत होते. प्रतिस्पर्ध्यांकडून काही अनुचित प्रकार केला गेल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात तरुणांना बोलावले होते. पोलीस निवडणुकीपूर्वी शहरातील गुन्हेगारांवर कारवाई करत असल्यामुळेच हा मार्ग अवलंबिला जात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात पैसेही मोजल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी गुंडांची आयात
By admin | Published: April 23, 2015 6:24 AM