Join us

सामाजिक कार्याला महत्त्व

By admin | Published: September 01, 2016 3:57 AM

गणेशोत्सवात मंडळाची प्रसिद्धी व्हावी, भक्तगणांच्या रांगा लागाव्यात, म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या देखाव्यांचा ट्रेंड गणेशोत्सवात दिसून येतो

लीनल गावडे, मुंबईगणेशोत्सवात मंडळाची प्रसिद्धी व्हावी, भक्तगणांच्या रांगा लागाव्यात, म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या देखाव्यांचा ट्रेंड गणेशोत्सवात दिसून येतो, पण देखाव्यावर पैसे खर्च करून मंडळाचे नाव मोठे करण्याचा मार्ग न स्वीकारता, हेच पैसे सामाजिक कार्यात वापरण्याचा वसा भांडुप येथील बैंगनपाडा गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. झगमगाटापेक्षा साध्या पद्धतीने गणेशोत्सवाला सजावट केली जाते. भांडुप पश्चिम येथील प्रतापनगर गणेशपाडा येथे बैंगनपाडा गणेशोत्सव मंडळ आहे. गेल्या ५२ वर्षांपासून या मंडळाने पारंपरिकतेची कास सोडलेली नाही. काळानुरूप बदलत गेलेल्या बाप्पांच्या मिरवणुकांच्या स्पर्धेतही हे मंडळ कधीच सहभागी झाले नाही. अत्यंत साधेपणाने या मंडळाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघते. सजावटीवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हे मंडळ गरजूंना मदत करते. दरवर्षी जमवलेल्या देणगीतील ठरावीक रक्कम हे मंडळ राखून ठेवते. ही रक्कम कांजूर येथील वात्सल्य अनाथ आश्रमाला दिली जाते, शिवाय येथील मुलांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. या परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना मंडळातर्फे मदत करण्यात येते.चलचित्र देखाव्याशिवाय सजविण्यात येणाऱ्या बैंगनपाड्याच्या बाप्पाचा थाट बघण्यासारखा असतो. येथील गणेशाची विशाल, मनमोहक मूर्ती अनेकांच्या पसंतीस उतरते. असा झाला उत्सवाचा श्रीगणेशाचाळीतील लोकांना एकत्र करण्यासाठी १९५२ साली येथील मैदानाच्या कोपऱ्यात मंडप बांधून, अगदी साध्या पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कालांतराने याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले, पण उत्सवातील साधेपणा मंडळाने अजून टिकवून ठेवला आहे. अजूनही पारंपरिक पद्धतीने बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते.डीजे नाहीच! डीजेची क्रेझ कितीही असली, तरी मंडळाने डीजेला कधीच पसंती दिली नाही. विशेष म्हणजे, मंडळातील तरुणांनीच पुढाकार घेऊन डीजेला ‘नो’ म्हटले आहे. त्यामुळे पैशांची बचत होते. बाप्पाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक अत्यंत साधेपणाने निघते. या वेळी लोक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी काढत, बाप्पाचे विसर्जन करतात. त्यामुळेच या मंडळाला मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून ‘उत्कृष्ट नियोजनाचे’ पुरस्कार मिळाले आहेत.