मुंबई - राज्यातील तुरुंगात असलेल्या जेष्ठ कैद्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना यापुढे बेड आणि उशी मिळणार आहे. एडिशनल डीजी(जेल) अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. मात्र, ज्या कैद्यांना ही सुविधा हवी आहे, त्यांनी स्वखर्चाने हे आणायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर मिळत होती. मात्र, गुप्ता यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कैदी परंपरेत बदल केला आहे.
अमिताभ गुप्ता यांनी तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, त्यामध्ये, काही कैदी हे विविध आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. तसेच, हे कैदी आजारपणामुळे रात्री नीट झोपू शकत नाहीत. त्यामुळेच, ५० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना तुरुंगात बेड आणि उशी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही खर्च स्वत: कैद्याने करायवयाचा आहे. त्यासाठीची साईजही निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या ५० वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्या कैद्यांची संख्या जवळपास साडे तीन ते ४ हजार एवढी आहे. जर एखाद्या सर्वसामान्य माणसाची नीटनीटकेपणे झोप झाली नाही, तर तो चिडचीड करू लागतो. मग, हे तर कैदी आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तुरुंगात एखादा कैदी अनेक दिवसांपासून आजारी असेल, तुरुंगातील डॉक्टरांनी तसे प्रमाणित केल्यास आणि शिफारीस केल्यास संबंधित कैद्यांनाही बेड आणि उशीचा वापर करण्यास परवानगी दिली जाते.