Join us

Rashmi Shukla : ‘रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती’, एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 9:25 AM

Rashmi Shukla : प्राथमिक तपासानुसार, रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमधील कथित भ्रष्टाचारावर फोन पाळत ठेवली.

मुंबई : फोन टॅपिंग व गोपनीय दस्तावेज उघड केल्याप्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे सध्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव नाही. पण तपास अधिकाऱ्यांच्या हाती त्यांच्याविरोधात तपास करण्याइतपत महत्त्वाचा तपशील हाती लागल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. 

प्राथमिक तपासानुसार, रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमधील कथित भ्रष्टाचारावर फोन पाळत ठेवली. त्यासंदर्भातील गोपनीय कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती एकत्रित करून ती तीन पेन ड्राईव्हमध्ये कॉपी केली. त्यातील दोन पेन ड्राईव्ह सरकारच्या ताब्यात आहेत आणि एक पेन ड्राईव्ह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात होता, त्यांनी तो पेन ड्राईव्ह गृह मंत्रालयाच्या ताब्यात दिला, असा आमचा अंदाज आहे, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाला यांच्या खंडपीठापुढे केला. 

संबंधित पेन ड्राईव्ह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून आम्हाला तिन्ही पेन ड्राईव्ह एकच आहेत की नाही, याची खातरजमा करून घ्यायची आहे. त्यासाठी तो पेन ड्राईव्ह आम्हाला द्यावा, यासाठी गृहमंत्रालयाला चार वेळा पत्र लिहिले. अद्याप उत्तर मिळाले नाही म्हणून दंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती ॲड. खंबाटा यांनी दिली. 

‘गोपनीय कागदपत्रे अशा पद्धतीने सार्वजनिक करणे, ही बाब गंभीर आहे. कागदपत्रे कोणी सार्वजनिक केली? याचबाबत आम्हाला तपास करायचा आहे. रश्मी शुक्ला यांचे सध्या तरी एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव नाही. परंतु, त्यांच्याविरोधात महत्त्वाचा तपशील हाती आला आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करण्यात येणार नाही, अशी खात्री देऊ शकत नाही,’ असे खंबाटा यांनी म्हटले. यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सीबीआयही करणार तपासफोन टॅपिंग व गोपनीय दस्तावेज उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलने नोंदविलेला एफआयआर रद्द करावा व तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत सीबीआयने आपण हा तपास करण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘या सर्व प्रकरणांमुळे आम्ही करत असलेल्या तपासाला हानी पोहोचायला नको. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणाचा तपासही आम्ही करत आहोत. हा तपासही त्यासंबंधी असल्याने आम्ही हा तपास करणार आहोत,’ असे सीबीआयतर्फे ॲडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :रश्मी शुक्ला