मुंबई - महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याबाबत २२ जून रोजी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या तपासात ईडीच्या हाती घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची डायरी हाती लागली आहे. केंद्रीय एजेन्सीनं १५ ठिकाणी धाड टाकली होती. ज्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांच्या घराचाही समावेश आहे.
या छापेमारीवेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना एका संशयिताच्या घरी डायरी सापडली. ज्यात बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील मध्यस्थाचा उल्लेख आहे. या डायरीत बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आलेल्या रक्कमेचाही समावेश आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राटे देण्यासाठी या मध्यस्थाने महत्त्वाची भूमिका निभावल्याचा संशय आहे.
कोविड काळात कंत्राटे देण्यासाठी ५ जणांचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी एक सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. वरळी कोविड सेंटर आणि दहिसर जम्बो कोविड सेंटरसाठी कंत्राट घेतलेल्या लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी चव्हाण यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले. शिवाय, छाप्यांदरम्यान यातील आणखी एक घर जे यासीर फर्निचरवालाचे होते, ज्यावर पूर्वी BMC शी संबंधित असलेल्या आणि सध्या महाराष्ट्र सरकारमधील दुसर्या विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ नोकरशहाचा फंड हाताळल्याचा संशय आहे. मात्र, फर्निचरवाला देशाबाहेर असल्याने त्यांचा फ्लॅट सील करण्यात आला असून, तो परतल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम राबवली जाणार आहे.
दरम्यान, हा घोटाळा ४ हजार कोटी रुपयांचा असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. त्यात अनेक BMC अधिकारी, वरिष्ठ IAS अधिकारी आणि खासगी व्यक्ती, ज्यात राजकीय पक्षाशी संबंधित आहेत यांचाही सहभाग आहे. कंत्राटदारांना कंत्राटे मिळवून देण्यात BMC शी विशेष प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे असं वृत्त इंडिया टुडेने दिलंय.