'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 09:48 AM2020-07-11T09:48:53+5:302020-07-11T10:04:37+5:30
त्यादृष्टीनं तो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. माझ्यामते तो योग्य निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले आहे.
मुंबई : परवा मुख्यमंत्र्यांनी सलून सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची आवश्यकता होती. कारण अनेक आमचे मित्र भेटायचे, कोरोनामुळे त्यांच्या डोक्यावर एवढे केस आहेत हे मला पहिल्यांदाच कळलं. व्यवसायात असलेल्या लोकांच्या कौटुंबिक समस्याही वाढायला लागलेल्या होत्या. त्यादृष्टीनं तो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. माझ्यामते तो योग्य निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Sharad Pawar Sanjay Raut Interview) पण त्यांचा जो स्वभाव आहे, तो त्यांना साजेसा आहे.
निर्णय घ्यायचा, तो अत्यंत सावधगिरीनं, हळूहळू, त्याचे दुष्परिमाण होणार नाहीत, याची जेवढी खातरजमा करून घेता येईल तेवढी करून मग त्याच्यावर पाऊल टाकायचं, असा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्येही हाच फरक आहे, असंही पवारांनी अधोरेखित केलं आहे.(Sharad Pawar Sanjay Raut Interview)
बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचे महत्त्वाचे घटक होते. त्यांच्या विचारानं सत्ता महाराष्ट्रात चालली आणि ते महाराष्ट्र आणि देशानं बघितलं. आज विचारानं चाललेली नव्हे, तर सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची जबाबदारी आजच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे या दोघांमध्ये हा फरक आहे. कोरोनाच्या काळात बाळासाहेबांची आठवण येते का, असं संजय राऊतांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, बाळासाहेबांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच माहीत होती. ते दिवसभर घराच्या बाहेर फिरून कामगिरीवर असायचे असं नाही. अनेक वेळेला त्यांनी दिवस दिवस घरात घालवले आहेत. पण सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून अशा परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी शिकवलेलं होतं. आपण घराच्या बाहेर पडायचं नाही, पण हळूहळू ज्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. त्या दिशेनं जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे. ते बाळासाहेब करायचे आणि त्याची आठवण या काळात नक्कीच येतेय, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, इथून पुढे प्रत्येक नागरिकाला तुम्हाला आणि मला कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. त्यामुळे कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉर्मलवरती येईल, पण याचा अर्थ तो कायमचाच संपला असा घेण्याचं कारण नाही. तो रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या काळात आपल्याला कोरोनाची काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवारांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हेही वाचा
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार
लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार
CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक