आज सकाळी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या देशपांडे यांच्यावर स्टम्पने मारून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात देशपांडे यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. मात्र या प्रकरणावरून राजकीय वाद पेटला असून, पोलिसांनीही या हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तक्रारीनंतर चौकशीला सुरुवात केली आहे. या चौकशीमध्ये हा हल्ला राजकीय वैमनस्यातून काही अज्ञात हल्लेखोरांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यात काही राजकीय नेत्यांची नावंही समोर आली आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी काही राजकीय नेत्यांची नावं घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी आता मनसे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करा. जर या प्रकरणात ते दोषी असतील तर अटक करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना फोन केला असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना दिलं.
संदीप देशपांडे हे आज सकाळी वॉकला गेले असताना ४ अज्ञातांनी हल्ला केला. संदीप देशपांडे रोज सकाळी वॉकला जातात हे हल्लेखोरांना माहिती होते. त्यानुसार प्लॅनिंग करून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोलीस अधिकारी पोहचले. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून हा हल्ला कुणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.