मुंबई – राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनामुळे पुन्हा निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठीही राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यात राज्यात १० महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
राज्यात शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात बिनसल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना सत्ताधारी आहे. ही सत्ता कायम टिकवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपानेही मोहीम आखली आहे. भाजपाने कोअर कमिटीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी आंदोलन, कार्यक्रम घेत लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
यात आता शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, विभागप्रमुख यांची अत्यंत महत्त्वाची बैठक मंगळवारी रात्री उशिरा घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिले आहेत. नुकतेच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतला तो जनतेपर्यंत पोहोचवा विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत आहे कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो. जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असा संकल्प करा असा आदेशही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.
होर्डिंग्स लावू नका
दरम्यान या बैठकीत मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. मोठ-मोठी बॅनर लावू नका. ते जनतेला आवडत नाहीत अशा सूचना आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक साडेदहा वाजता सुरू झाली ती साडेअकराला संपली.