पोलीस खात्यातर्फे लक्झरी बसमालकांची महत्त्वाची बैठक
By admin | Published: September 23, 2014 10:18 PM2014-09-23T22:18:34+5:302014-09-24T00:01:34+5:30
लक्झरी बसेसचे अपघात होऊ नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या
रत्नागिरी : जिल्ह्यातून मुंबई आणि पुणे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसेसचे मालक व प्रतिनिधी यांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी घेतली. यावेळी डॉ. शिंदे यांनी सर्व प्रतिनिधींना मार्गदर्शन करुन लक्झरी बसेसचे अपघात रोखण्यासाठी मार्गदर्शन करुन उपाय सूचवले. लक्झरी बसेसचे अपघात होऊ नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. यात प्रामुख्याने प्रत्येक लक्झरी बसेसवर दोन चालक असावेत. चालक नेमताना त्याचे लायसन व बॅज पाहावेत. कमीत कमी ५ ते ७ वर्षांचा अनुभव असलेले नेमावेत. त्यांना नेमताना त्यांची लक्झरी चालविण्याची टेस्ट घेण्यात यावी. लक्झरी बस चालविण्यास सक्षम असल्याचे दरमहा वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. चालकाला कमीत कमी वेळेत गाडी पोहोचविण्याची सक्ती करु नये. ४ ते ५ तासानी चालक बदलण्यात यावा. बस दरमहिना मॅकेनिकलकडून तपासणी करुन घेऊन त्याचे फिटनेस प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करावे. लक्झरी बस चालवताना चालक मोबाईल फोनवर बोलणार नाही, गरज भासली तस मोबाईलवर क्लिनर संभाषण करेल. मुदतबाह्य बस वाहतुकीसाठी आणली जाणार नाही, याची काळजी मालकांनी घ्यावी. वाहनांना फॉग लाईट बसवावी. कशेडी ते राजापूर अपघातप्रवण ठिकाण जेथे सुरु होते, त्याआधी रोडवर वाहनांची गती कमी व्हावी, यासाठी एस पध्दतीने बॅरीकेटस लावण्यात येणार आहेत. वाहन चालकाने त्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सावर्डे येथील हॉटेल सागर पॅलेसजवळ मुंबईकडून येणाऱ्या लक्झरी बसेस थांबवून चालकांना फ्रेश करुन पुढे मार्गस्थ करण्यासाठी सावर्डे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह लक्झरी बसधारकांचे दोन प्रतिनिधी रात्री ठेवण्यात यावेत. तसेच एस. टी. महामंडळाकडून कशेडी येथील चेकपोस्ट सुरु करण्यात यावे, अशी सूचना डॉ. शिंदे यांनी बैठकीत केली.
बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस उपअधीक्षक महेश थिटे, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)