Join us

मुंबईतील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:24 IST

वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे.

मुंबई: सध्या चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरिता एमएच ०१ ईआर ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यानंतर याच संवर्गातील आगाऊ स्वरूपात सुरू असलेली एमएच ०१ ईव्ही मालिका नियमित होणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक / पसंती क्रमांक हवा असल्यास वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई -१८ वरून विहीत नमुन्यातील अर्ज  शुल्क भरून १३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्राप्त करून घ्यावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पद्धतीचा त्याच दिवशी १३ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजता अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे.

कार्यालयीन विहीत नमुन्यातील अर्जान्वये कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येतो. वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याकरिता विहीत शुल्काचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) (Regional Transport Office, Mumbai (central)) यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. या आरक्षीत केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांकरिता असून १८० दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. संबंधीत कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई -१८ वर वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, वाहनक्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एन्ट्रीच्या वेळी वाहन ०४ प्रणालीमध्ये घेतल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतो. वाहन क्रमांक आरक्षित करण्याकरिता फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती  ही कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक वाहनधारकांनी एमएच ०१ ईव्ही या मालिकेतील पसंतीचे, आकर्षक वाहनक्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केलं आहे.

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी