मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी, 'दादर'वाल्यांसाठी खास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:54 PM2022-07-07T22:54:54+5:302022-07-07T22:56:16+5:30
दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर १२०० मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले
मुंबई : महानगरातील दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने उद्या ८ जुलै रोजी एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर १२०० मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सदर जलवाहिनी फुटल्याचा परिणाम म्हणून उद्या शुक्रवार, दिनांक ८ जुलै २०२२ रोजी खाली नमूद केलेल्या विभागामध्ये पहाटे ४.०० ते सकाळी १०.०० या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही.
१) एफ / उत्तर विभाग
दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी,
२) एफ/दक्षिण विभाग
दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी.
संबंधित परिसरातील नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.