दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या महिन्याभरावर आल्या असून, विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. अशावेळी अभ्यासाचे नेमके नियोजन कसे करावे आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांना मार्गदर्शनाची आवश्यक आहे. याचसाठी राज्य मंडळाकडून नियुक्त समुपदेशक आणि गांधी बालमंदिर हायस्कूल, कुर्ला येथे कार्यरत शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांकडून सतत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले आहे.
१) बोर्डाच्या परीक्षांना दोन महिने राहिलेले असताना विद्यार्थ्यांचा अजूनही स्वअभ्यास झालेला नाही, यासाठी त्यांना काय मार्गदर्शन कराल?
➡️ दोन महिने हा कालावधी कमी नाही. राज्य मंडळाने यापूर्वीच एकूण विचारांती सुमारे दोन महिने परीक्षा पुढे ढकलून २५% अभ्यासही वगळला आहे. आता विद्यार्थ्यांचे स्वतःचे असे लिखित किंवा अलिखित वेळापत्रक असावे. सर्वप्रथम विषयनिहाय एकूण पाठ/घटक, त्याच्या तयारीला लागणारा वेळ, स्वतःची अभ्यासाची पद्धत यांचा विचार करावा. पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन करून परीक्षेसाठी लागणारी स्वतःची टिपणे (नोट्स) काढावीत किंवा उपलब्ध झालेले सर्व प्रकारचे साहित्य वापरावे. वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. हे सर्व करण्यासाठी वेळ राखून ठेवावा. सर्वच विषयांच्या वेळापत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्यावा. एकच एक विषय किंवा त्याचाच अभ्यास करत बसण्यापेक्षा सर्व विषयांना पुरेसा वेळ द्यावा. काही वेळ शिक्षकांमार्फत होत असलेल्या शंका-समाधान सत्रासाठी आवश्य द्यावा. पुरेशी झोप आणि रोजची अत्यावश्यक कामे यासाठी लागणारा वेळ वगळून उरलेला पूर्ण वेळ स्वअभ्यासासाठी वापरावा. अनावश्यक घरगुती चर्चा, मोबाइलचा वापर, वेळखाऊ कामे यात वेळ खर्च करू नये. सध्या शाळा, कॉलेज, क्लासेसमध्ये जाण्या-येण्याचा खूप मोठा वेळ वाचला आहे. त्याचा सदुपयोग करावा.
२) शाळा सुरू नसल्याने इतर जिल्ह्यांतील किंवा जेथे शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत आहे त्या विद्यार्थ्यांपेक्षा आपण मागे राहू, कमी गुण मिळतील अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. ती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे?
➡️ खरे पाहता अशी केलेली तुलना, स्पर्धा आणि त्यामुळे सतत येणाऱ्या विचारांमध्येच ‘आपण मागे पडू’ या भीतीचे मूळ लपलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची, त्याच्या ठिकाण व कुटुंबाची परिस्थिती भिन्न आहे. मोठी शहरेवगळता जेथे प्रत्यक्ष शाळा, कॉलेज सुरू होऊन सध्या शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत आहे तिथे या आधी ऑनलाइन शिक्षण तितकेसे पोहचू शकत नव्हते. मात्र शहरी भागात बऱ्यापैकी इंटरनेट, मोबाइल, शिक्षक संपर्क आणि इतर सुविधा आहेत. तुलनात्मक विचार आणि इतरांशी स्पर्धा करण्याचा हा काळ नाही हे स्वीकारणे हिताचे आहे. आपल्याकडे काय नाही यापेक्षा जे आहे त्याचा पुरेपूर शोध आणि वापर करून ही भीती घालविता येईल. टोकाचे विचार येत राहिल्यास पालक, शिक्षक किंवा समुपदेशकांची नक्की मदत घ्या. maa.ac.in. या वेबसाइटवर जिल्हानिहाय सुमारे ४२८ प्रशिक्षित समुपदेशकांची यादी उपलब्ध आहे.
३) यंदाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप अद्याप निश्चित नाही. प्रचलित पद्धतीने परीक्षा होतील इतकेच माहीत असताना तयारी सुरू कशी ठेवावी?
➡️ दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या संदर्भात समाजमाध्यमांमधून बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. त्या अर्धवट माहितीवर आधारित तसेच गोंधळ वाढविणाऱ्या, भडक स्वरूपात असू शकतात. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. एससीईआरटी आणि बोर्डाने अधिकृत संकेतस्थळावर (https://mahahsscboard.in/) विषयनिहाय वगळलेला पाठ्यांश, परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक, प्रश्नपत्रिका आराखडा, गुणदान, ऑफलाइन परीक्षा पद्धती याची सुस्पष्ट माहिती आधीच दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यानुसारच अभ्यास करणे अभिप्रेत आहे. कोणताही बदल पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना न देता होणार नाही हे लक्षात घ्या. आपल्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना कटाक्षाने पाळा.
४) अनेक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानासारखे विषय कठीण जातील, असे वाटत आहे. त्यांच्या तयारीसाठी काय करावे?
➡️ कोविड-१९ काळात ऑनलाइन पद्धतीने गणित, विज्ञान हे विषय शिकविणे आणि समजून घेणे यात अनेक अडचणी आल्या हे खरे आहे. असे असले तरी याच काळात वेगवेगळ्या शिक्षकांचे प्रत्येक पाठावर प्रचंड प्रमाणात ई-साहित्यही उपलब्ध झाले. त्याची मदत होऊ शकते. सोप्याकडून कठीणाकडे, वस्तुनिष्ठ प्रश्नांकडून दीर्घोत्तरी प्रश्नांकडे, असंबद्ध लिखाणाकडून मुद्देसूद उत्तरांकडे, सरावातून उपयोजना व कौशल्याकडे ही चतुःसूत्री आजमितीस गणित, विज्ञानाच्या अभ्यासास पूरक ठरू शकते. अभ्यास करताना येणाऱ्या शंका नोंद करून ठेवा. त्या सोडविण्यासाठी न घाबरता, निसंकोचपणे शिक्षकांशी संपर्क साधा. वेळीच अडचणी सोडवून घ्याव्यात.
५) ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटली आहे. त्यामुळे पेपर पूर्ण होणार नाही, अशी भीती विद्यार्थी, पालकांना आहे. सरावासाठी काय उपाय सुचवाल?
➡️ हो, अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली की, पेपर वेळेत पूर्ण होणार नाही असे ६५% विद्यार्थांना वाटत आहे, तर शुद्धलेखनाच्या चुका होतील, खराब हस्ताक्षर येईल आणि लिखाणातून मुद्दे सुटतील अशी शंकाही अनुक्रमे १२, १० आणि ७% मुलांच्या मनात आहे. परंतु, बोर्ड परीक्षा अजून दोन महिन्यांनी आहे. वेळ लावून सराव प्रश्नसंचातील प्रश्नपत्रिका सोडवून लिखाणाच्या भरपूर सरावासाठी पुरेसा वेळ हातात आहे. मुलांनी स्वतःच साप्ताहिक नियोजन करून प्रत्येक विषयाच्या शक्य तितक्या प्रश्नपत्रिका सोडविल्यास निश्चित गती आणि अचूकता साध्य करता येईल. दुसरे म्हणजे पालकांच्या मदतीने रोज थोडा श्रुत लेखनाचा (डिक्टेशन) सराव केल्यास ही गती वाढू शकते. शाळा/ महाविद्यालयाच्या नियोजित संपर्काने सोडविल्या गेल्यास उत्तरपत्रिका शिक्षकांमार्फत तपासून घेता येतील. त्यातून चुकांचे प्रमाण कमी करता येईल व हस्ताक्षर सुवाच्य होण्यासही मदत होईल.
जयवंत कुलकर्णी
राज्य मंडळ नियुक्त शिक्षक समुपदेशक
..............................