Join us

नव्या वर्षात मुंबईत आकारास येणार महत्वाचे प्रकल्प

By जयंत होवाळ | Published: January 27, 2024 6:35 PM

नव्या वर्षात कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होत असताना आणखी अनेक महत्वाच्या प्रकल्पांची वीट रचली जाणार आहे.

मुंबई: नव्या वर्षात कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होत असताना आणखी अनेक महत्वाच्या प्रकल्पांची वीट रचली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्य विविध भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. रस्ते काँक्रीटीकरण आणि जलशुद्धीकरण प्रकल्प नव्या वर्षात आकारास येतील. पालिका रुग्णालयात 'झिरो प्रिस्क्रिप्शन ' संकल्पना प्रत्यक्षात उतरेल... या वर्षात मुंबईत पायाभूत आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत महत्वाच्या घडामोडी अपेक्षित आहेत. प्रजासत्ताक दिनी मुंबई महापालिकेच्या प्रभारी आयुक्त अश्विनी जोशी यांनी भविष्यातील मुंबईचे चित्र उभे केले. आयुक्त इकबाल सिंह यांच्या अनुपस्थितीत जोशी यांच्या हस्ते प्रजसत्ताक दिनी पालिका मुख्यलयात ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांची माहिती मुंबईकरांना दिली. कोस्टल रोडची एक मार्गिका या वर्षात कार्यान्वित होईल. उत्तर मुंबईपर्यंत वाहतूक वेगवान व्हावी म्हणून वर्सोवा ते दहिसर किनारी रस्ता आणि त्यापुढे दहिसर ते मिरा-भाइंदर उन्नत मार्ग, गोरेगाव-मुलूंड हे प्रकल्प देखील नियोजित आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण व्यापक स्तरावर सुरु केले आहे. वेगवेगळ्या पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. भविष्याचा विचार करता, पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी जलबोगद्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. भांडूप संकुल येथे २,००० दशलक्ष लीटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचे नियोजन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अस्वच्छतेच्या तक्रारींचे जलद, परिणामकारक निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या ''मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई'' या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत १० हजारांहून अधिक तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात आला असून या कामगिरीसाठी 'ईटी गव्हर्मेंट डिजीटेक अवॉर्डस' स्पर्धेमध्ये महानगरपालिकेला सुवर्णपदक प्राप्त झाले, असेही त्यांनी सांगितले. 

मुंबईतील सुशोभीकरणाचा आढावा घेताना, मुंबई सुशोभीकरण प्रकल्पा अंतर्गत मोकळ्या जागांची निर्मिती, रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक बेटे , समुद्रकिनारे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सुशोभीत सार्वजनिक भिंती आदींशी निगडित १२०० कामे आतापर्यंत पूर्ण केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पालिका रुग्णालयांमध्ये 'झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी' लागू करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदीची आवश्यकताच उरणार नाही. मुंबईकरांना घराजवळ, सोयीच्या वेळेनुसार आणि सर्वसमावेशक व विनामूल्य अशी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' तसेच पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर सेवेचा आतापर्यंत ३० लाखाहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

कामकाजाची प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानातील अद्ययावत व अत्याधुनिक बाबींचा अवलंब केला जात आहे. ऑनलाइन प्रणाली, कॅशलेस आणि पेपरलेस सेवा यावर अधिकाधिक जोर दिला जात आहे. अग्नी सुरक्षेच्या दृष्टिने अत्याधुनिक संयंत्रांची मदत, नागरिकांकडून सक्त निर्देशांचे पालन, जनजागृती यावर भर देण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. मुंबई अग्निशमन दलाच्या सहा अधिकारी तसेच कर्मचऱ्यांना राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. भिडे यांनी या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.

टॅग्स :मुंबई