कर्करोगाच्या उपचार पद्धतींविषयी महत्त्वाचे संशोधन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 03:14 AM2018-10-07T03:14:31+5:302018-10-07T03:14:39+5:30

गेली ११९ वर्षे ‘रोगापहारि विज्ञानं लोककल्याण साधनम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील पहिली हाफकिन ही संशोधन संस्था जीवशास्त्रीय व लस संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.

 Important research courses on cancer treatment methods | कर्करोगाच्या उपचार पद्धतींविषयी महत्त्वाचे संशोधन सुरू

कर्करोगाच्या उपचार पद्धतींविषयी महत्त्वाचे संशोधन सुरू

Next

गेली ११९ वर्षे ‘रोगापहारि विज्ञानं लोककल्याण साधनम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील पहिली हाफकिन ही संशोधन संस्था जीवशास्त्रीय व लस संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र काळाच्या ओघात या संस्थेत झालेले बदल, नवीन प्रकल्प आणि नवी आव्हाने यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या कॉफीटेबल सदरातून घेण्यात आला आहे. हाफकिन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांच्याशी प्रतिनिधी स्नेहा मोरे यांनी केलेली ही बातचीत...

हाफकिन संशोधन संस्थेत होणारे नवे बदल कोणते ?
हाफकिन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत लवकरच देशातील मोठी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. टाटा कर्करोग संस्थेच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशातील प्रमुख विषाणू संशोधन संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन व उच्च शिक्षण दिले जात नाही हे लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन तसेच चाचण्या आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे 'सेंटर आॅफ एक्सलन्स' नजीकच्या काळात उभे राहणार आहे. यासाठी जवळपास वीस कोटी रुपयांचा निधी दोन्ही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येईल.

विष संशोधनाविषयी कोणते नवे पाऊल उचलले जात आहे ?
सर्पदंशाच्या लसी संशोधन क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविण्यासाठी हाफकिनच्या माध्यमातून कायम प्रयत्न सुरू असतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विष संशोधन केंद्र सुरू करावे, असा मानस आहे. सापाच्या विषाच्या माध्यमातून आणखी काही उपयोग करून घेता येईल का याविषयी संशोधन करण्यात येईल. शिवाय, या विषाद्वारे लस किंवा लससदृश काही औषध बनविता आले तर त्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. याविषयी माशेलकर समितीनेही पाठिंबा दिला असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्य विभागाला पत्र पाठविले आहे. प्रत्येक प्रदेशाप्रमाणे सापाच्या विषाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांचे शरीरावर होणारे परिणामही वेगळे असतात. या सर्व मुद्द्यांचा जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यास करून यात नवीन संशोधन आणि प्रयोग करण्यात येणार आहेत. यात सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प हाती घेतला असून त्याद्वारे राज्यातल्या जिल्ह्यात संस्थेचे पथक भेट देऊन याविषयी अभ्यास करत आहोत. नुकताच या पथकाचा १९ दिवसांचा कोकण प्रांतातला दौरा सुरू आहे. प्रत्येक ठिकाणच्या सापाचे विष गोळा करून त्याचे पृथक्करण करून त्याविषयी संशोधन करायचे. केंद्रीय स्तरावरही हा प्रकल्प राबविताना चार प्रदेशांची निवड करून तेथील सापांचे विष घेऊन संशोधन करण्यात येईल.

सर्पदंशाची सर्वाधिक प्रकरणे कुठे आढळतात?
देशात दरवर्षी दोन ते तीन लाख सर्पदंशाची प्रकरणे आढळतात. त्यातून ५० हजार मृत्यू होतात. राष्ट्रीय पातळीवर राज्यात सर्वाधिक मृत्यू होतात, तर राज्य पातळीवर सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये होतात. महाराष्ट्राखालोखाल पश्चिम बंगालमध्येही सर्पदंशाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून सर्पदंशाची स्थिती अशाच प्रकारे असल्याचे दिसून येते. सध्या कुठल्या सापाच्या दंशाने सर्वाधिक मृत्यू होतात, याचा तपशील उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे अशा प्रकारे नोंदणी ठेवणारी यंत्रणा कार्यरत नाही. शिवाय, मृत्यूनंतरही कोणत्या सापाच्या विषामुळे मृत्यू झाला हे निदान करणारी वैद्यकीय सुविधाही आपल्याकडे नाही. आम्ही संस्थेच्या माध्यमातून सर्प, सर्पदंशाचे उपचार, प्राथमिक औषधोपचार याविषयी जनजागृती करण्यात येते, नुकतीच शालेय स्तरावर अशाप्रकारे जनजागृती करण्यात आली आहे.

संस्थेत सापाच्या विष संशोधनापलीकडे कोणत्या क्षेत्राविषयी काम सुरू आहे का?
क्षयरोगाविषयी आपल्या संस्थेद्वारे मोठे संशोधन सुरू आहे. क्षयरोगाचे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे, क्षयमुक्त देशासाठी शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यात संस्थेला नुकतेच डिपार्टमेंट आफ बायोटेक्नोलॉजी यांच्याकडून ९० लाखांचे अनुदान मिळाले आहे. क्षयरोगाचे उपचार वर्षानुवर्षे सुरू असतात. म्हणजे, क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर
सहा महिने उपचार घ्यावे लागतात, मात्र
त्यानंतर ते कधी थांबवावे याबाबत अनिश्चितता असते.
क्षयरोगाचे निदानही फार लवकर होत नाही. त्यामुळे आम्ही निदान लवकर व्हावे यादृष्टीने संशोधन करत आहोत. सध्या जिन-एक्स्पर्ट या चाचणीद्वारे निदान होते, मात्र त्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. शिवाय, या चाचणीत २० टक्के निदानाची खात्री देता येत नाही. त्यामळे आम्ही सहज आणि कमी कालावधीत होणाऱ्या वैद्यकीय चाचणीचा शोध घेत आहोत. सध्या क्षयरोग निदान होण्याच्या प्रक्रियेत तीन आठवडे जंतू वाढल्यानंतर त्याविषयी चाचणी करण्यात येते, त्यामुळे हा कालावधी टाळण्यासाठी अभ्यास व संशोधनाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, रेबीजच्या लसीत नवे संशोधन सुरू आहे. या लसीत काही अद्ययावत प्रमाणीकरण करता येईल यासाठी आपले तज्ज्ञ संशोधन करीत आहेत.

कर्करोगाचे गेल्या काही वर्षांत प्रमाण वाढतेय, याविषयी काही संशोधन होतेय का ?
कर्करोगाविषयी लक्षणे आणि उपचार पद्धती अशा दोन्ही पातळ्यांवर
संशोधन सुरू आहे. सध्या कर्करोगाविषयी होणाºया चर्चेचे श्रेय वाढत्या निदान पद्धतीला आहे. पूर्वी निदान उशिरा व्हायचे, आता निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उपचार पद्धती वाढल्या आहेत. कर्करोगाविषयी निदान आणि उपचार पद्धतीत सुधारणा खूप वेगाने होत आहेत. त्यामुळे याची उपचार प्रक्रियेत मदत होते आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा कर्करोग ओळखण्यासाठी एकच प्रकारची चाचणी आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा त्याविषयी संशोधन शक्य नाही. कारण आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींची रचना, त्याचे कार्य, क्षमता वेगवेगळी असते.

शासनाकडून संस्थेला पुरेशी मदत मिळते आहे का ?
केवळ राज्य शासनाकडून संस्थेला अनुदान मिळते, मात्र ते पुरेसे नाही. आता मिळणारे अनुदान हे अत्यल्प आहे. काही योजनांसाठी शासनाने अनुदान वाढविले आहे, मात्र बºयाच योजना आणि संशोधन प्रकल्पांसाठी आणखी अनुदानाची गरज आहे. शिवाय, देशातील अन्य संशोधन संस्थांना मिळणाºया अनुदानाशी तुलना केल्यास हाफकिनला मिळणारे अनुदान अत्यंत नगण्य आहे. या निधीपैकी बराच खर्च इमारतीच्या डागडुजीसाठी केला जातो. कारण ही इमारत ब्रिटिशांच्या काळातील असल्याने तिची देखरेख करण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. मात्र आता लवकरच हाफकिनच्या आवारात नवी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक झाली असून त्यांनी नवा आराखडा तयार करण्यास सांगितला आहे.
संस्थेतील सर्पालयाचे वैशिष्ट्य काय आहे?
संस्थेत सर्पालय असून त्यात विविध प्रकारचे साप आहेत. आपल्याकडे साप केवळ ९० दिवस ठेवण्याची परवानगी आहे. त्यानंतर तो साप ज्या ठिकाणाहून आणला त्या ठिकाणी सोडून देण्यात येतो, बºयाचदा हे ठिकाण आम्ही जीपीएस पद्धतीने शोधून त्यांची नोंद करून ठेवतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून आम्ही संशोधन करायचे हे तत्त्व पाळतो. देशातील पहिल्या सर्पालयाची निर्मिती याच संस्थेमध्ये १९४० साली करण्यात आली. या सर्पालयाचा उपयोग संशोधनासाठी करण्यात येतो.

Web Title:  Important research courses on cancer treatment methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई