पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामांमुळे चेंबूरमधील महत्त्वाचे मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:06 AM2019-08-02T03:06:43+5:302019-08-02T03:07:00+5:30

सिंधी सोसायटी व कलेक्टर कॉलनी या परिसरांना जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

Important routes in Chembur closed due to repair work without prior notice | पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामांमुळे चेंबूरमधील महत्त्वाचे मार्ग बंद

पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामांमुळे चेंबूरमधील महत्त्वाचे मार्ग बंद

Next

मुंबई : पावसाने बुधवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यामुळे महापालिकेकडून खड्डे बुजविण्याची कामे सुरू झाली. चेंबूरच्या अनेक भागांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या मार्गांवर महापालिकेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात चेंबूरमधील सिंधी सोसायटी व कलेक्टर कॉलनी या परिसरांना जोडणारा मार्ग व चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ असणारा मार्ग क्र. १७ हे दोन महत्त्वाचे मार्ग दुरुस्तीमुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता हे मार्ग बंद केल्याने विद्यार्थी व वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

सिंधी सोसायटी व कलेक्टर कॉलनी या परिसरांना जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या दोन्ही परिसरांमध्ये अनेक शाळा व कॉलेज आहेत. यामुळे येथून विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता हा मार्ग बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये जायचे कुठून, असा प्रश्न पडला होता. तरीदेखील काही विद्यार्थी रस्त्याच्या कडेकडेने तर काही विद्यार्थी मातीच्या ढिगाºयावरून चालत जाऊन शाळा व कॉलेजमध्ये जात होते. बाजूलाच जेसीबी व ट्रकद्वारे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता होती. रस्ता बंद असल्याने दोन्ही परिसरातील वाहनांना चेंबूर कॅम्प येथून वळसा घालून जावे लागत होते. याबाबतीत तेथे उपस्थित कंत्राटदार व अभियंत्यांना विचारले असता कॉलेज प्रशासनाकडून महानगरपालिकेकडे खड्ड्यांसंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही येथे रस्ता दुरुस्त करीत आहोत, असे सांगण्यात आले.
चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ असणारा मार्ग क्र. १७ बंद केल्यामुळे रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरून चेंबूर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी वाहनांना जैन मंदिर मार्गावरून जावे लागत आहे. यामुळे परिसरात
मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे.

दुरुस्ती लवकरात लवकर करा! :
चेंबूरमधील दोन महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
 

Web Title: Important routes in Chembur closed due to repair work without prior notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.